मागील काही वर्षात दुष्काळाने पिचलेल्या महाराष्ट्राला भारतीय हवामान खात्याने सुखद धक्का दिला आहे. भारतीय हवामान खात्याने यावर्षी पडणाऱ्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हा अंदाज बळीराजासाठी सुखावणारा आहे. कारण यावर्षी सरासरीपेक्षा अधिक ( १०५ ) टक्के इतका पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. या अंदाजात पाच टक्के कमी अधिक तफावतीची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे याचाच अर्थ यावर्षी १०० ते ११० टक्के पावसाची शक्यता आहे. देशाच्या उत्तर आणि ईशान्य भागात तसेच महाराष्ट्रासह दक्षिण भागातही सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रावर वरुण राजाची कृपा राहणार असून कायम दुष्काळग्रस्त असणाऱ्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचे प्रमाण अधिक असण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याच्या या अंदाजाने राज्यातील बळीराजा सुखावला आहे.
हा अंदाज बळीराजासाठी जितका सुखावणारा आहे तितकाच तो उद्योग जगतासाठीही सुखावणारा आहे. कारण कोरोनामुळे उद्योग जगताची घसरलेली गाडी अजूनही सावरलेली नाही. त्यात मागील दोन वर्ष राज्यावर दुष्काळाचे सावट होते. मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळसदृश परिस्थिती होती त्याचा उद्योग जगतावर देखील मोठा परिणाम झाला आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारताची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. शेती हाच भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आजही देशाची ६० टक्के लोकसंख्या ही शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे तिच्या स्थैर्यासाठी आणि विकासासाठी शेतीचे विशेष महत्व आहे. मागील काही वर्ष देशात दुष्काळ पडला होता. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला होता. कोरोनामुळे देशातील अनेक उद्योग ठप्प पडले होते त्यामुळे देशाचा जिडीपी ही घसरला होता अशावेळी शेती क्षेत्राने देशाला वाचवले होते. कोरोना गेल्यानंतर सर्व काही सुरळीत होईल अशी अपेक्षा असतानाच मागील दोन वर्ष देशात आणि राज्यातील काही भागात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या वर्षी राज्यात समाधानकारक पाऊस पडला असला तरी राज्यातील काही भागात दुष्काळसदृशच परिस्थिती होती.
दुष्काळसदृश परिस्थितीमुळे राज्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील पाणी साठा संपत आला आहे. नद्या कोरड्या पडल्या आहेत. धरणे आटली आहे. बोअरवेलला पाणी लागत नाही. नागरिकांना वापरण्यासाठी सोडा पण पिण्यासाठी देखील पाणी मिळत नाही. एका एका हंड्यासाठी नागरिकांना कैक किलोमिटरची पायपीट करावी लागत आहे. शहरातही काही भागात टँकर चालू आहे. राज्यातील काही भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतीलाही पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. अशावेळी सर्वांच्या नजरा हवामान खात्याच्या अंदाजाकडे लागल्या होत्या. सुदैवाने हवामान खात्याचा सुखद अंदाज आल्याने राज्यातील दुष्काळग्रस्त नागरिकांना सुखद धक्का बसला आहे. यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याने भरघोस पीक येऊन रान आबादानी होणार आहे. शिवाय राज्यातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे. जर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पाऊस झाला तर उद्योग जगतावर ही त्याचा सकारात्मक परिणाम होईल. एकूणच हवामान खात्याने वर्तवलेला मान्सूनचा हा सुखद अंदाज सर्वांनाच सुखावणारा आहे.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५