जत,प्रतिनिधी : जत शहरातील प्रभाग क्र.8 मधील ईदगाह रोड ते घाटगेवाडी रस्ता या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण काम दर्जाहीन झाल्याचे स्पष्ट झाले असून एकाच पावसात या रस्त्यावर टाकण्यात आलेले डांबर निघून जावून रस्त्यावरील खडी वर आली आहे.
जत शहरातील प्रभाग क्र.8 मधील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. हे काम करित असताना सबंधित कामाचे ठेकेदार यांनी कामाचे ठिकाणी कामाची संपूर्ण माहिती दर्शविणारा फलक लावलेला नाही.त्यामुळे हे काम कोणी केले,रस्त्याचे स्वरूप,किती मटेरियल वापरले, हे समजून येत नाही.
या कामामध्ये सि.डी.वर्क न घेता सिमेंट पाईपा टाकून नियमबाह्य कामे केल्याचा व रस्त्याच्या कामात कमी प्रमाणात खडी व डांबराचा वापर करण्यात आल्याचा येथील ग्रामस्थाचा आरोप आहे.
नुकत्याच येऊन गेलेल्या पावसात या रस्त्यावर टाकण्यात आलेले डांबर वाहून गेल्याने सबंधित ठेकेदार,त्यांच्यावर लक्ष ठेवणाऱ्या बांधकाम विभागाचे पितळ उघडे पडले आहे.या रस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी पावसामुळे रस्त्यावर टाकण्यात आलेले डांबर निघून गेले आहे.
त्या ठिकाणी पुन्हा डांबरीकरण करण्याचा उद्योग सुरू केला आहे. झालेले काम निकृष्ठ व दर्जा हिन असे करण्यात आले आहे. या रस्त्याचे दोन बाजूस साईडपट्टया ह्या मुरूम मिस्त्रीत माती टाकून केल्या आहेत.त्या साईडपट्टया वर सबंधित ठेकेदार यानी रोलींगही केलेले नाही.तरी प्रशासनाने या संपूर्ण रस्ता कामाची खातेनिहाय चौकशी करावी,अशी मागणी या परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
जत शहरातील प्रभाग क्र 8 मधील रस्त्यावरील डांबर पहिल्याच पाऊसात वाहून गेले आहे.