जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील मुख्य रस्ते पूर्णपणे उखडले असून, सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पहिल्याच पावसात पोल खोल… रस्त्याचे खड्डे कसे गोल गोल, अशी प्रतिक्रिया नागरिक तसेच वाहनचालकांमधून व्यक्त होत आहे.जत तालुक्यातील शेकडो वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या जत शहराला दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे.
शहरात दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते.शहराकडे येणारे अनेक मार्ग चारच महिन्यापुर्वी डांबरीकरणाने चकाचक केले होते.मात्र गेल्या पंधरवड्यात पडत असलेल्या पावसाने या रस्ते कामासह,जतच्या बांधकाम विभागाचा प्रताप चव्हाट्यावर आणली आहे. शहरातील ही अनेक रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. कित्येक ठिकाणी पाईपलाईनसाठी रस्त्यात खोदकाम केल्याने त्याठिकाणी खड्डे नव्हे तर स्वयंघोषित गतिरोधक तयार होत आहेत. एकाच पावसाने रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्याने रस्त्याच्या कामांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी दबलेले रस्ते,नव्या रस्त्यावरील वाहून गेलेले डांबरीकरणाचे अवषेश,पडलेले खड्डे पहिल्यावर नेमके बांधकाम विभागाचे अधिकारी करतात तरी काय असा प्रश्न पडत आहे.
- कामाचा दर्जा टिकवावा
-
ठेकेदाराने रस्त्यासाठी अतिशय हीन दजार्चे मटेरीयल वापरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. तरी बांधकाम विभागाने लोकांच्या जीवाशी खेळ न खेळता रस्त्याच्या कामाचा दर्जा योग्य राहील याची काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
पावसात रस्त्याची कामे
-
तालुक्यातील काही रस्त्याची आताही भर पावसात कामे सुरू आहेत.हे बांधकाम विभागाच्या निदर्शनास येत नाही हे विशेष. मात्र पावसात केलेले रस्ते अगदी आठवड्यात उखडेले आहेत.अशा दर्जाहीन रस्त्यामुळे पहिलेच रस्ते बरे म्हणायची वेळ नागरिकावर आली आहे.