मीच माझा व माझ्या कुटुंबाचा रक्षक या भावनेतून कोरोनाला हरविण्यासाठी दक्षता घ्या
सांगली : नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वयंशिस्त पाळावी. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. त्यासाठी सार्वत्रिक सामाजिक दबाव निर्माण करावा. मास्क अनिवार्यपणे वापरावा. या बाबींकडे दुर्लक्ष केल्याने, अनावश्यकपणे गर्दी वाढल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यास लॉकडाऊन हा अंतिम पर्याय राहील असे सांगून जिल्ह्यात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची सक्तीने अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले.
ताप, सर्दी, खोकला, डायरिया, स्नायूदुखी, मानसिक गोंधळलेली स्थिती आदि लक्षणे जाणवल्यास तात्काळ फिवर क्लिनिक, आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. 50 वर्षावरील व कोमॉर्बिडिटी असणाऱ्या रूग्णांनी कोणतेही दुखणे अंगावर काढू नये. त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसेच खाजगी डॉक्टरांनी कोरोनाची लक्षणे असणारा रूग्ण तपासणीसाठी त्यांच्याकडे आल्यास त्वरीत डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलकडे संदर्भित करावा. लवकर निदान झाल्यास लवकर उपचार सुरू होतील आणि पुढील दुष्परिणाम टाळता येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात वृत्तपत्रांचे संपादक, आवृत्ती प्रमुख यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे उपस्थित होते.दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वयंशिस्त पाळावी. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे स्वयंस्फूर्तीने पालन करावे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, नागरिकांमधील हलगर्जीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्यास लॉकडाऊनचा पर्याय खुला राहील. तथापी हा पर्याय अंमलात आणावा लागू नये यासाठी प्रत्येकाने मीच माझा व माझ्या कुटुंबाचा रक्षक या भावनेतून कोरोनाला हरविण्यासाठी दक्षता घ्यावी. बँका, बेकरी, दुकानदार यांनी त्यांच्याकडे होणाऱ्या गर्दीचे नियत्रंण करावे. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी देखील पीपीई किट व अन्य संरक्षक सामग्रीचा वापर अनिवार्यपणे करावा. ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी स्वत:चे थर्मामीटर, पल्स ऑक्सिमीटर घेऊन मॉनिटरींग करावे. ऑक्सिजनची पातळी 92 च्या खाली आल्यास त्वरीत आरोग्य तपासणी करून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
जतच्या सिध्दार्थ पब्लिक स्कूलचा सीबीएसई बोर्ड परिक्षेत 100 टक्के निकाल
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जिल्ह्यात रॅपीड ॲन्टीजेन टेस्ट कीट उपलब्ध झाले असून सांगली, विटा, कवठेमहांकाळ येथे शासकीय रूग्णांलयामध्ये याचा वापर सुरू करण्यात आला आहे. महानगरपालिका क्षेत्रातील कंटेनमेंट झोन मध्येही याचा वापर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आयसीएमआरची परवानगी असणाऱ्या खाजगी लॅबला ही कोरोना तपासणीची परवानगी देण्यात आली असून तपासणीसाठीचे शुल्क 2200 रूपये व घरी जाऊन सॅम्पल घेतल्यास 2800 रूपये शुल्क शासनाने निश्चित केले आहे. कोविड हॉस्पीटल मिरज येथे आयसीयु बेडची क्षमता वाढविण्यात येत आहे तर भारती हॉस्पीटल येथेही क्षमता वृध्दी करण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेशी संलग्नीत असणारी खाजगी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल्सही कोविड-19 उपचारासाठी घेण्यात येतील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले, येत्या काळात होणाऱ्या विविध सण, उत्सवांमध्ये कोणत्याही प्रकारची मिरवणूक निघणार नाही, लोक जमा होणार नाहीत याबाबत संबंधित घटकांना सूचित करण्यात आले असून यास विविध घटकांनी सहमती दर्शविल्याचे सांगितले. तसेच अफवा पसरविणाऱ्या जवळपास 11 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून हा काळ अत्यंत संवेदनशिल आहे, त्यामुळे सामाजिक माध्यमे किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून अफवा पसरवू नयेत, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.