जत,प्रतिनिधी : संपन्न जैवविविधता असलेल्या देशात भारताचा समावेश असणे अभिमानास्पद आहे. पण हे जैववैविध्य टिकविण्यासाठी आपल्याला कसून प्रयत्न करायला हवेत. पर्यावरण संवर्धन, जैवविविधता यांसारखे शब्द सध्या खूपच परवलीचे झाले आहेत. शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन वेळीच केले नाही, तर भविष्यात आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागेल, असे प्रतिपादन प्रा. डॉ. भाऊराव दांगट यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने 22 मे रोजी जागतिक जैवविविधता दिनानिमित्त “जैवविविधता व तिचे संरक्षण” या विषयावर आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय वेबीनारमध्ये प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.
जगातल्या संपन्न जैवविविधता असलेल्या मोजक्या प्रदेशांपैकी भारत एक आहे. थरसारखा वाळवंटी प्रदेश, हिमालयाच्या सान्निध्यात असलेल्या सूचिपर्णी वृक्षांची जंगले, तसेच नेपाळच्या सीमेजवळील तराईचे प्रदेश आणि ईशान्येकडील ब्रह्मदेशापर्यंत पसरलेली निबीड अरण्ये, सागराजवळील खारफुटीची राने आणि अंदमान-निकोबार, लक्षद्विपसारखी द्विपकल्पे यांसारख्या बहुविध परिसंस्थांमुळे भारतात विपुल जैवसंपदा आढळून येते. पश्चिमघाट किंवा सह्याद्रीच्या डोंगरांगा यापैकीच एक. सागराचे सान्निध्य, कमी-जास्त पर्जन्यमान, मृदाप्रकार, भूशास्त्रीय स्तर यांचा वनांवर झालेला परिणाम व त्यामुळे निर्माण झालेली विविधता याचा एकत्रित परिणाम म्हणून येथे अधिवासांची विविधता असून मानवी लोकसंख्या व तिच्याकडून होणारे जैवविधतेचे नुकसान यामुळे अनेक प्रजाती कायमच्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तरी आपण जैवविविधतेचे संरक्षण करणे गरजेचे आहे असे शेवटी डाॅ. दांगट यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्राचार्य डॉ. व्ही.एस. ढेकळे म्हणाले की, जैवविविधतेची खरी किंमत एखाद्या प्रजातीचे तिथले पर्यावरण टिकवून ठेवण्यात किती योगदान आहे, त्या प्रजातीमुळे इतर जीवनावश्यक गोष्टींना कसा फायदा होतो, या बाबींचे विश्लेषण केल्यास कळून येईल. उदा. अनेक प्रकारची झाडे-झुडपे, वेलींनी समृद्ध असे जंगल टिकून राहिले, तर फळमाशा, मधमाशा, फुलपाखरे, पक्षी, प्राणी तर वाढतीलच; पण त्यामुळे परागीभवन होऊन आपल्या नारळी, पोफळी, आंबा, काजू यांसारख्या बागाही टिकून राहतील. एखाद्या परिसरातल्या टेकड्या, डोंगर यावर हिरवे आच्छादन असल्यास पाण्याचे झरे, डोह, विहिरी लवकर आटत नाहीत. त्यामुळे जत व इतर दुष्काळी भागात पडीक माळावर जास्तीत जास्त वृक्षलागवड करणे गरजेचे आहे.
वेबिनारचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. राजेंद्र लवटे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. तुकाराम सन्नके यांनी केले. डॉ. संजय लठ्ठे, डाॅ. शिवाजी कुलाळ, प्रा. दिपक कुंभार व प्रा. अभयकुमार पाटील यांनी संयोजक म्हणून काम पाहिले. या वेबीनारला देशभरातील विविध विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक यांनी झूम अँपच्या माध्यमातून आपला सक्रिय सहभाग नोंदवला.