Untitled Post

0
2

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे महाराष्ट्राला लाभलेल्या संतांच्या माळेचे एक मनी आहेत. त्यांचे पूर्ण नाव माणिक बंडूजी इंगळे त्यांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोपंत तर आईचे नाव मंजुळाबाई होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव माणिक होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देश विकासाची संकल्पना ग्रामविकासातून पुढे जाते हे त्यांनी आपल्या ग्रामगीतेतून  मांडले .आपल्या ग्रामगीतेत त्यानी जातिभेद, अंधश्रद्धा, कर्मकांड, अनिष्ट रूढी प्रथा, परंपरा यांना तीव्र विरोध करून प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाच्या मनोवृत्तीत आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे काम या राष्ट्रसंतांनी केले. गाव गावती जागवा, भेदभाव समूळ मिटवा. उजळावा राष्ट्र प्रेमाचा दिवा तुकड्या म्हणे. आपल्या भजन कीर्तनाच्या माध्यमातून खंजिरीच्या साह्याने समाजामध्ये जातिभेद बाळगू नका, दारू पिऊ नका, अंधश्रद्धा, वाईट रूढी परंपरा आणि अपायकारक व्यसनांचा त्याग करून देशावर अखंड प्रेम करा अशी शिकवण देत होते. त्यात तू नीच मी उच्च म्हणुनी वाढविले अवडंबर पूर्ण त्यानेच झाले गावाचे पतन सर्व पंथाचे व धर्माचे लोक त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी झाले आणि स्वतःपासून सुधारणा करण्याचा जणू त्यांनी चंग बांधला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहून गावाचे व  जीवनाचे कल्याण कशात आहे अतिशय साध्या व सोप्या भाषेत समजून सांगितले.  अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन यासाठी त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रामुख्याने सामाजिक समतेचा प्रचार व प्रसार केला.  ग्रामगीतेतून स्वच्छतेचे महत्त्व सांगताना तुकडोजी महाराज म्हणतात “मिळोनी करावी ग्रामसफाई! नाली, मोरी ठायीठायी! हस्ते-परहस्ते साफ सर्वहि! चहुकडे मार्ग! गावातील रोगराई हटविण्यासाठी प्रथम गाव स्वच्छ केला पाहिजे. त्याशिवाय रोगराई हटणार नाही. जातिभेद टाळल्याशिवाय मानवतावादी जीवन जगता येणार नाही.स्त्री-पुरुष दोघे साक्षर झाल्याशिवाय समाज सुधारणार नाही. यासाठी सर्वांनी शिकून शहाणे व्हा असा उपद्देश तुकडोजी महाराजांनी केला. देवभोळेपणा व जुन्या कालबाह्य अंधश्रद्धा  नाहीशा करण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. प्रामुख्याने सर्वधर्मसमभाव हे त्यांच्या विचारधारेचे एक प्रभावी व महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होते. त्यासाठी त्यांनी सर्वधर्मीय प्रार्थनेचा पुरस्कार केल्याचे आपणास दिसून येते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विवेकनिष्ठ जीवनमूल्यांचा पुरस्कार केला. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला वेळोवेळी त्यांनी विरोध केला. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी आपल्या खंजिरी भजनाच्या माध्यमातून मानवतेस अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा  प्रचार प्रसार केला. राष्ट्राच्या उन्नतीचा ध्यास त्याने आयुष्यभर आपल्या उराशी बाळगला. जातिभेद विसरुनिया एक हो आम्ही, अस्पृश्यता नष्ट हो आतुनी.  राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रामुख्याने तथागत गौतम बुद्ध आणि महात्मा बसवेश्वर यांचे लोककल्याणकारी विवेकी समतेचे विचार समाजापुढे मांडले.  तथागत बुद्धा विषयी ते म्हणतात, ” हाती न घेता तलवार ,बुद्ध राज्य करी जगावर”. त्याशी  कारणं एक  प्रचार-प्रसार. प्रभावशाली महिला सक्षमीकरण हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता.  प्रामुख्याने स्त्री-पुरुष समतेचे बीज पेरण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आपल्या कीर्तन, भजनाच्या माध्यमातून त्यांनी स्त्री शिक्षणाचा प्रचार प्रसार केला. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून आहे हे समाजाला सांगण्याचे कार्य करून समाजाला सज्ञान  करण्यात महत्त्वपूर्ण वाटा उचलला. भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्रामविकासाने राष्ट्राचा विकास होईल या हेतूने प्रत्येक गाव आनंदी, समृद्ध, समताग्राम करण्याकडे त्यांचा महत्त्वपूर्ण कल होता.  समाजातील सर्व घटकांचा विकास होण्यासाठी मनात जडलेली आंतरिक  जातीयतेची घाण  काढण्यासाठी त्यांनी विविध स्तरावर वैचारिक प्रबोधन केले.  “अभिमान राहिला वर्णाचा, चुराडा झाला गुणकर्माचा, ऐसा घडविला संकर गावाचा, घडी काही बसेना.” ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांची त्यांना पुरेपुर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी विविध उपाय सुचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. प्रामुख्याने त्यांनी सुचवलेल्या ग्रामविकासाच्या विविध उपाययोजना त्या काळातही उपयोगी तर होत्याच पण आजही त्या उपयोगी आहेत.ग्राम  हे सुशिक्षित, सुसंस्कृत,गृहउद्योगी,संपन्न, वैचारिक एकंदरीत समताग्राम या संकल्पनेच्या माध्यमातून गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात अशी त्यांची धारणा होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आधुनिक युगातील परिवर्तनवादी विचारांचे वादळ होते. जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी विश्वबंधुत्वाची भावना वाढीस लावण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. देशातील तरूण हे राष्ट्राचे भावी प्रगतिशील आधारस्तंभ आहेत. हे जाणून  त्यांनी तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी  मार्गदर्शन पर भजने कीर्तने केली.1942 च्या लढ्यात त्यांनी सत्याग्रह केला होता. इंग्रजांच्या शासन काळात त्यांनी इंग्रजांच्या अमानवी कृत्यांवर अनेकदा टीका केली. त्यासाठी त्यांना नागपूर आणि रायपूर येथील जेलमध्ये तुरुंगवास भोगावा लागला होता. भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी आपले सगळे लक्ष भारतातील खेड्यांच्या विकासासाठी आणि पुनर्निर्माणासाठी लावले. त्यांनी 1935 साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. अंधश्रद्धा आणि जातिभेद भारतीय समाजाला लागलेला काळीमा आहे असे ते मानत. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आणि जाती भेद मिटवण्यासाठी त्यांनी आपल्या भजनांचा प्रभावीपणे वापर केला. त्यांची कीर्तने आजही लोकप्रिय आहेत. त्यांनी त्या काळात संदेश दिला होता की बाबांनो खेड्याकडे चला. त्यांनी दिलेल्या संदेशाचे महत्त्व लोकांना आज कळते. त्यांनी ग्रामगीतेची रचना केली. त्यात त्यांनी खेड्याच्या  विकासासाठी काय करावे यावर भर दिला.जेव्हा 1962 साली चीन युद्ध व 1965 साली पाकिस्तान युद्ध झाले तेव्हा त्यांनी भारतीय सैन्यास धीर देण्यासाठी स्वतः सीमेवर जाऊन सैन्याचे मनोधैर्य आणि राष्ट्रनिष्ठा वाढवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.  राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती महोदय राजेंद्रप्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी दिली.असे महान संत आपल्या देशात होऊन गेले ही आपल्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. त्यांचा मृत्यू दिनांक 11 ऑक्टोबर 1968 साली झाला त्या वेळी त्यांचे वय 59 वर्षे होते.अशा या महान समतावादी संताला त्यांच्या जयंती कोटी कोटी प्रणाम…

लेखक : शंकर नामदेव गच्चे,नांदेड  मोबाईल नंबर : 8275390410 


Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here