बेजबाबदारपणा | नागरिक रस्त्यांवर,’सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पायदळी |
जत,प्रतिनिधी : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या ‘लॉकडाऊन’च्या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी
नगर परिषद,तालुका प्रशासन,ग्रामपंचायती व पोलीस यंत्रणेकडून कडक उपाययोजना केल्या असतानाही शहरासह तालुक्यातील सर्वच गावात ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. या ना त्या कारणाने नागरिक रस्त्यांवर येत गर्दी करीत आहेत.
‘लॉकडाऊन’ची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी यासाठी प्रशासन उपाययोजना करीत आहे. नागरिकांना या काळात भाजीपाला मिळावा यासाठी जतेसह अनेक गावातील नेहमीचा बाजार स्थलांतरित करून नव्या जागा निश्चित केल्या आहेत. मात्र, तिथेही खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. लोकांच्या अतिउत्साही, बेजबाबदारपणा व बेपर्वाईमुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येत आहे.

किराणा माल दुकानात नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून सुरक्षा बॉक्स तयार केले होते. असे असले तरी सकाळी व सायंकाळी अनेक ठिकाणी लोक विनाकारण किरकोळ खरेदीसाठी बाहेर पडत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. कोणी औषध घेण्यासाठी, कोणी दूध आणण्यासाठी तर कोणी भाजीपाला किंवा घरातील किराणा साहित्य आणण्याचे कारण सांगून बाहेर पडून रस्त्यांवर गर्दी करीत आहेत.प्रशासनाच्या वतीने वारंवार सूचना देऊनदेखील येथील ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळले जात नसल्याचे पाहण्यास मिळते. याबद्दल प्रशासनाच्यावतीने नाराजी व्यक्त करीत नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात येत होते.