जत,प्रतिनिधी :जत तालुक्यातील जत शहर व ग्रामीण भागातील विविध बँकामधून माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात ग्राहकांना जलद व उत्तम सेवा मिळावी यादृष्टीने कार्यालयात अत्याधुनिक यंत्राचा वापर करण्यात येत आहे. संगणक प्रणालीचा वापर करण्यात होत असला तरीही सततच्या तांत्रिक बिघाडामुळे ग्राहकांची कामे खोळंबतात. येथील एका राष्ट्रीयकृत बँकेतील साधनांना नादुरुस्तीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे कामे जलद होण्याऐवजी ग्राहकांची ताटकळ होत आहे. अनेक बँकामधून पासबुक पिंट्रसाठीही टाळाटाळ केली जात आहे. अशा वेळी खातेदार व बँक कर्मचाऱ्यात वादाचे प्रकार घडत आहेत.ग्राहकांच्या वेळेची बचत करण्यासाठी येथे विविध उपकरणे उपलब्ध करून दिली आहे. मात्र अशा अनेक बँक शाखेतील अधिकाधिक साधने बंद आहेत. अथवा नादुरुस्त असल्याने ती ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अनेक बँकात प्रत्येक विभागासाठी वेगवेगळ्या खिडक्या आहे. यामुळे येथील ग्राहक संख्या मोठी आहे. स्थानिक स्टेट बँक शाखेत एटीएम केंद्र, कॉईन मशिन, पासबुक प्रिटींग मशिन, राशी स्थानांतर मशीन यासारख्या अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध करुन दिल्या आहे. त्यामुळे ग्राहकांना रांगेत उभे न राहता व वेळेचा अपव्यय होऊ न देता कामे करता येतात. यामागील बँक प्रशासनाचा हेतू निश्चितच चांगला आहे. परंतु आवश्यक वेळी किंवा सणासुदीच्या दिवसात ही यंत्रे तासन्तास बंद असतात. त्यामुळे सेवा सुरू होण्यासाठी खातेधारकांना ताटकळत रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे या सेवेचा खातेधारकांना उपयोग होण्याऐवजी नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गलथान कारभारामुळे खातेधारकांत नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. ग्राहकांच्या वेळेचा अपव्यय होवू नये, त्यांना आर्थिक व्यवहार त्वरीत करता यावे, याकरिता विविध राष्ट्रीयकृत बँकांनी शाखा कार्यालय, रेल्वेस्टेशन येथे एटीएम मशीन दिल्या आहे. पण एटीएमसेवा सुरळीत सुरू आहे किंवा नाही, त्यात रक्कम आहे काय हे पाहण्याची तसदी बँक अधिकारी घेत नसल्याचे दिसते. परिणामी ग्राहकांना केवळ मनस्ताप करुन तिथून परतावे लागते. ज्येष्ठ नागरिक व महिलांकरिता वेगळी रांग नसल्याने त्यांना भर उन्हाळ्ळ्यातही त्रास सहन करीत रांगेत लागावे लागते. लिंक फेल, एटीएममधील बिघाड हे प्रकार नित्याचेच झाल्याने याची दखल घेणे अगत्याचे झाले आहे.