जत,प्रतिनिधी : महालक्ष्मी दिनदर्शिकेच्या बनावट प्रती विकल्याप्रकरणी जतमधील कोटलगी पुस्तकालयाचे मालक आप्पासाहेब बिराप्पा कोटलगी (वय 37 रा.बकेंश्वर मंदिर)यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.कोटलगी यांच्याकडून 8750 रूपयाच्या 350 बनावट दिनदर्शिका जप्त करण्यात आल्या आहेत.याप्रकरणी प्रकाशक रणवीर श्रीपाद शिर्के रा.कोल्हापूर यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी,आप्पासाहेब कोटलगी हे त्यांच्या कोटलगी पुस्तकालयात रजिस्टर ट्रेडमार्क असलेल्या महालक्ष्मी दिनदर्शिकेच्या बनावट प्रती कब्जात बाळगून त्यांची बेकायदेशीर विक्री करत असल्याचे आढळून आले.त्यांच्याकडून साडेतीनशे बनावट दिनदर्शिकेच्या प्रती जप्त करण्यात आल्या.कोल्हापूर येथील महालक्ष्मी दिनदर्शिकेच्या बनावट प्रती विकल्या जात असल्याच्या संशयावरून कंपनीच्या प्रकाशकांनी सांगलीत तक्रार दिली होती.त्यानुसार थेट स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांने कोटलगी यांच्या पुस्तक दुकानात छापा टाकला.त्यात कोटलगी यांच्याकडे असलेल्या दिनदर्शिका बनावट असल्याचे लक्षात आल्याने त्यांच्यासह बनावट दिनदर्शिका जप्त केल्या.याप्रकरणी कॉपीराइट अँक्ट नुसार गुन्हा दाखल झाला आहे.आप्पासाहेब कोटलगी यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.दरम्यान महालक्ष्मी दिनदर्शिकेच्या बनावट प्रतीचे रँकेट कार्यरत असल्याचे समोर आले असून त्याचा तपास करण्याचे आवाहन जत पोलीसासमोर आहे.अधिक तपास पो.नि.आर.आर.शेळके करत आहेत.