जत,प्रतिनिधी : चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांनी एक गाव एक गणपती ही संकल्पा गावोगावी राबवल्या जाणाऱ्या गावांना मोफत गणेश मूर्ती देण्याचा मानस व्यक्त केला आहे. दुष्काळी व पूरस्थितीचा विचार करून जत तालुक्यातील गणेश मंडळांनी प्रत्येक गावात एक गाव एक गणपती हा अभिनव उपक्रम राबवावा. हा उपक्रम राबवणाऱ्या गावातील गणेश मंडळाला मोफत मूर्ती व वृक्ष भेट देण्यात येणार आहेत.गणेश मंडळांनी 29 ऑगस्ट पर्यत संख येथील बाबा मंगल कार्यालय येथे नाव नोंदणी करावी असे आवाहन चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम महाराजांनी पत्रकार परिषदेत केले.
चिकलगी मठाच्या वतीने 2010 पासून जत तालुक्यातील गुडडापूर, गोधळेवाडी, संखसह अन्य गावात आतापर्यत 100 मंडळाला मोफत श्री.च्या मूर्ती देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अनेक गावाला नवरात्र उत्सव काळात देवीची मूर्ती देण्यात येतात. यावर्षी जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून गावातील मंडळांनी गावात एक गाव एक गणपती हा अभिनव उपक्रम राबवावा. हा अभिनव उपक्रम राबविणाऱ्या गावाला श्री ची मोफत मूर्ती तर देण्यात येईलच पण त्याचबरोबर त्या गावात चिकलगी मठ व गणेश मंडळाच्या मार्फत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन करण्यात येणार आहे.त्यासाठी आपण मोफत वृक्ष देणार असल्याचे यावेळी तुकाराम महाराज यांनी सांगितले.
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली. गणेशोत्सव साजरा करण्याचा त्यावेळीचा उद्देश हा समाजजागृती, तरुणाईमध्ये एकता निर्माण करून भारताला स्वातंत्र मिळवून देणे होते. आज काळाच्या ओघात गणेशोत्सवाचे रूप बदलले असल्याचे सांगून तुकाराम महाराज म्हणाले आजही गावोगावी, शहरात दरवर्षी गणेशोत्सव मोठया उत्साहाने साजरा केला जातो. गणेशोत्सवानिमित्य विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजजागृती केली जाते, मुलांना हक्काचे व्यासपीठ मिळते. आजचा गणेशोत्सव हा समाजजागृतीचा असला तरी अनावश्यक होणारा खर्च , तरुणाईत निर्माण होणारी इर्षा ही चिंतेची बाब आहे हे मान्यच करावे लागेल.
दुष्काळी तालुका असलेल्या जत तालुक्यात यंदा भिषण दुष्काळ पडला आहे. शंभराहून अधिक टँकरने जतकरांची तहान भागवली गेली. जनावरासाठी तिसहून अधिक छावण्या सुरू करण्यात आल्या. ऐन पावसाळ्यात पावसाने जतकराकडे पाठ फिरवल्याने आज तालुक्यातील 28 पैकी 22 तलाव कोरडेठाक पडले आहे. गावोगावी आज दुष्काळाची भिषणता जाणवू लागल्याने जतकर चिंताग्रस्त असून आगामी गणेशोत्सव साजरा करताना याचे भान सर्वानी ठेवावे असे आवाहन करून तुकाराम महाराज म्हणाले.