जतचा पाणी प्रश्न सोडविण्याची जलसंपदा मंञ्याची ग्वाही
जत,प्रतिनिधी :जत तालुक्यातील पुर्व भागातील म्हैशाळ योजनेपासून वंचित असणाऱ्या 48 गावांचा समावेश करून तात्काळ कामे सुरू करावीत,अशी मागणी आमदार विलासराव जगताप यांनी प्रश्नोत्तराच्या तासावेळी विधानसभेत केली.आमदार जगताप यांनी विधानसभेत म्हैसाळच्या पाणी प्रश्नावर जोरदार आवाज उठवत,जत दुष्काळी भाग असल्याने पाणी योजनेसाठी प्राधान्य देण्याची गरज असल्याचे सांगितले.
जत पूर्व भागातील 48 गावात पिण्याचा पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाणी प्रश्न सोडविण्याकरिता या गावातील जनतेने अनेक वेळा रस्तारोको,आंदोलने,सांगलीपर्यंत पायी पदयात्रा काढलेली आहे.जनतेच्या भावनेचा विचार करावा.या गावांचा समावेश करण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मान्यता दिलेली आहे. तरी या गावांचा तातडीने सर्वेक्षण करावे, ही योजना तात्काळ मंजूर करावी व दुष्काळी भागातील जनतेला दिलासा द्यावा,असा प्रश्न उपस्थित केला.यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उत्तर देताना म्हणाले,सध्या उपलब्ध पाण्याचा प्रश्न आहे. मात्र जतच्या पाणीप्रश्नावर सरकार गांभीर्याने विचार करीत आहोत.पाण्याची उपलब्धता पाहून सर्वेक्षण करीत असल्याचे स्पष्ट केले.हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.