उमदी,वार्ताहर :जतपासून तब्बल 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि राष्ट्रीय महामार्गावरचे गाव असणाऱ्या उमदी (ता.जत)येथे स्वतंत्र एसटी आगाराची स्थापना करून अद्ययावत बसस्थानक सुरू करण्याची मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.याचा विचार करून उमदी येथे एस टी आगार उभारण्यासाठी शासन स्तरांवर पाठपुरावा सुरू असल्याची माहिती जत तालुका विकास मंचचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते नजीर नदाफ यांनी दिली.
जत तालुक्याचे विस्तार क्षेत्र मोठे आहे. जतपासून उमदी 60 किलोमीटर तर संख 45 किलोमीटर अंतरावर आहे.उमदी-संखचे अंतर 27 किलोमीटर आहे.आता अप्पर तहसील कार्यालय संख येथे सुरू झाले आहे. या परिसरातील लोकांना संख येथे जायला एसटीची वेळेवर सोय नाही. शिवाय उमदी हे ठिकाण पंढरपूर-विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावर (क्रमांक एनएच 516 अ) आहे. भविष्यात उमदी-संख तालुका झाल्यास या मार्गावर दळणवळण वाढणार आहे. सध्या उमदीमध्ये विविध शैक्षणिक संस्थांचे जाळे विणले जात आहे. त्यामुळे वर्दळ वाढणार आहे. उमदी परिसरातील लोकांचे बहुतांश व्यवहार मंगळवेढा,पंढरपूर (जि.सोलापूर), इंडी,विजयपूर (कर्नाटक) या भागाशी आहेत.त्यामुळे आगाराला चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
सध्या जतमधून तालुक्यातील सर्वच गावांमध्ये होणार्या बस खेपा फारच कमी आहेत. त्यामुळे जतच्या पूर्वभागात एसटीचा वर्दळ कमी आहे. शिवाय एसटीकडे गाड्यांची कमतरता,गळक्या-मोडक्या-तोडक्या गाड्या, चालक-वाहकांची अपुरी संख्या यामुळे आहे त्या गाड्या वेळेवर येत-जात नाही. नव्या गाड्या सुरू करता येत नाहीत.या सगळ्यांचा विचार करता जत पूर्वभागात उमदीला नव्या आगाराची स्थापना करून बसस्थानक उभारण्यात यावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
“जत तालुक्याच्या पूर्व भागाचे हद्द 75 किलोमीटर आहे. जतहून प्रवाशी व शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी अंतर जास्त आहे. त्यामुळे प्रवाशी व विद्यार्थी यांच्या मागणीप्रमाणे सेवा पुरवणे एसटीला अशक्य आहे. त्यामुळे उमदीला एसटी आगार होण्याची गरज आहे.”
नजीर नदाफ,
अध्यक्ष,जत तालुका विकास मंच