जत,प्रतिनिधी : शहरापासून उमराणी रोडवर असणाऱ्या फॉरेस्टजवळ टँकर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात इरय्या सिदय्या मठपती (वय-18,रा-मेंढेगिरी) हा तरूण जागीच ठार झाला.तर अन्य दोनजण गंभीर जखमी झाले.हा अपघात गुरुवारी रात्री नऊ वाजता झाला.
याबाबतची माहिती अशी, सिदय्या स्वामी यांचा जत शहरातील मारुती मंदिराजवळ फुले विक्रीचा व्यवसाय आहे.त्यांचा मुलगा इरय्या येथील एका किराणा दुकानात काम करतो. नेहमीप्रमाणे काम संपल्यावर इरय्या आपल्या बहिणी व तिच्या मुलाला घेऊन मेंढेगिरीला दुचाकीवरून जात होता. त्याची दुचाकी जतपासून दोन किलोमीटर अंतरावरील फॉरेस्ट जवळ आली असता वळणावर उभे असलेल्या पाण्याच्या टँकरला धडकली.त्यात इरय्याच्या डोकीला जबर मार बसल्याने रक्तस्त्राव होऊन तो जागीच ठार झाला. तर त्याची बहीण व भाचा गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ मिरज शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.मठपती कुटंबिय मूळचे कोठ्ठलगी (कर्नाटक) चे आहेत. फुलांचा व्यवसायासाठी जतमध्ये राहतात.व्यवसाय करत शेतजमीन घेऊन मेंढेगिरीला स्थायिक झाले होते. मुलीचे लग्न झाल्यानंतर नुकतीच त्यांनी शेतजमीन विकली आहे. चार दिवसांनंतर सर्वजण मूळगावी राहायला जाणार होते.त्यापूर्वीच त्यांचा मुलावर काळाने घाला घातला.सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.