जत,प्रतिनिधी : गत वर्षीच्या खरीप हंगामात शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत राज्य शासन संवेदनशील आहे. जत तालुक्यासाठी(54 गावे) -24 कोटी 64 लाख 49 हजार 15 रूपये मदतीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.पैंकी पहिला हप्ता(12 कोटी 32 लाख 24 हजार 508 रूपये)बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी उपलब्ध झाला असून, मदतीचा पहिला हप्त्यांतर्गत जिल्ह्यात 34 कोटी 40 लाख 64 हजार इतका निधी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला आहे.दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांत विविध उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. हा निधी जत येथील तहसिलदारांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीव्दारे उपलब्ध करून दिला आहे. त्यावर संबंधित तहसीलदारांनी त्वरित कार्यवाही करायची आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी दिले आहेत.याबाबत जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, खरीप हंगाम 2018 मध्ये शासन निर्णय दिनांक 31 ऑक्टोबर 2018 अन्वये सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी व खानापूर-विटा या 5 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला. तेथील शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान वाटप करण्याचा निर्णय दिनांक 25 जानेवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला. त्यानुसार सांगली जिल्ह्यासाठी 68 कोटी 81 लाख 28 हजार इतका निधी दोन हप्त्यामध्ये वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी प्रथम हप्ता 34 कोटी 40 लाख 64 हजार इतका निधी प्राप्त झाला आहे.





