जत,वार्ताहर:आ.विलासराव जगताप यांच्यावर टिका करण्यापूर्वी सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांनी आपण कोणामुळे या पदावर बसलो याचे भान ठेवावे.पात्रता नसताना तुम्ही कुणामुळे या पदावर आहात यांचे मुल्याकंन करावे.आमदारकीचे डोहाळे लागल्याने सभापती पाटील यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे.पद द्या म्हणून पाया पडणाऱ्या सभापती पाटील यांच्यात जर हिम्मत असेल तर त्यांनी जि.प.सदस्य पदाचा राजीनामा देवून पुन्हा निवडणूक रिंगणात उतरावे. पुन्हा निवडून आलात तर आम्ही स्वतःआमदारकीला तुमचा प्रचार करू असे थेट आव्हान जत पंचायत समितीचे माजी सभापती बसवराज बिरादार, जि.प.सदस्य सरदार पाटील,भाजप ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष नागनाथ मोटे, माजी पंचायत समिती सदस्य सोमण्णा हाक्के, जाडरबोबलादचे माजी उपसरपंच शिवानंद बिरादार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिले.
बसवराज बिरादार यांनी सभापती रवीपाटील यांचा चेहरा दाखविला, आ.जगताप यांची हकालपट्टीची मागणी करणाऱ्या सभापती रवीपाटील हे स्वतःच्या हिंमतीवर नव्हे तर आमच्यासारख्या जगताप समर्थकांनी जिवाचे रान केल्याने निवडून आले आहेत.
आ.जगताप यांनी इतरांना डावलून रवीपाटील यांना सभापतीपदी संधी दिली. या संधीचे सोने करायचे सोडून आ.जगताप यांच्यावर टिका करून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.जातीय राजकारणाचे बेरीज जुळवीत आमदारकीची तयारी करण्याचा हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे.आपल्याच मतदार संघात सदस्य म्हणून पुन्हा निवडून येण्याची ज्यांची पात्रता नाही,ते आमदारकीसाठी मोर्चेबांधणी करत आहेत. प्रथम जि.प.सदस्य पदाचा राजीनामा द्या, निवडणूक लढवा. पुन्हा निवडून येताय का बघू.
बिराजदार म्हणाले, सभापती रवीपाटील यांना आमदारकीचे स्वप्ने पडू लागल्याने त्यांचा पाय व जीभ घसरली आहे. आ.जगताप हे जि.प.चे उपाध्यक्ष झाले.तेव्हा सभापती पाटील यांच्या चुलत्याचा त्यांना पाठिंबा होता हे पूर्णतः चुकीचे आहे. घराणेशाहीचा नामोल्लेख करून स्वतःची पाठ स्वतःथोपटून घेणाऱ्या सभापती रवीपाटील यांनी आत्मचिंतन करावे असा टोला बिरादार यांनी लगावला.
सरदार पाटील म्हणाले की,आमदारकीचे स्वप्ने पाहणारे सभापती रवीपाटील यांना आपण कोणामुळे या पदावर पोहचलो यांचे आत्मचिंतन करावे.शिक्षण व आरोग्य ही महत्वाची खाती जतला मिळाल्याने दुष्काळी जतला त्याचा फायदा होईल असे वाटत होते. पण प्रत्यक्षात उलटे घडत आहे. सभापती रवीपाटील यांचा कार्यकाळ संपत आला,तरी जतला अद्याप भरीव निधी मिळालेलाच नाही. उलट जतमधील जि.प. सदस्यांच्या गटातील शाळा जाणीवपूर्वक डावलल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
पक्षनिष्ठा शिकविणारे भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडोडगी हे भाजपच्या आमदार, खासदारावर टिका करताना गप्प बसतात त्यावेळी त्यांची भाजप निष्ठा कोठे गेली होती असा सवाल नागनाथ मोटे यांनी उपस्थित केला.