भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदी जोशी यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर

0
28

येत्या १५ फेब्रुवारीला एका ध्येयवेड्या जोडप्याची गोष्ट ‘आनंदी गोपाळ’ प्रेक्षकांच्या भेटीला

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीशी एक स्त्री असते हे विधान काही आपल्यासाठी नवीन नाही. पण प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या सोबतीने असतो तिला प्रोत्साहन देणारा ‘तो’! अशाच एका ध्येयवेड्या जोडप्याची गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही जोडपी अशी असतात, जी आपल्या ध्येयपूर्तीसाठी वेगळी वाट निवडतात आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी नवीन पाऊलवाट मोकळी करून देतात. ‘आनंदी’ आणि ‘गोपाळ’ असंच एक जोडपं. त्यांच्या प्रेरणादायी जीवनसंघर्षावर आधारित समीर विद्वांस दिग्दर्शित आणि झी स्टुडिओज् प्रस्तुत ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १५ फेब्रुवारीला आनंदी आणि गोपाळ यांचा जीवनप्रवास इतिहासाच्या सोनेरी पानांवरुन रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. नुकताच ह्या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

१८८२ साली जेव्हा स्त्रीने उंबरठा ओलांडून जाणे समाजमान्य नव्हते तेव्हा वयाच्या केवळ अठराव्या वर्षी सातासमुद्रापार बोटीनं परदेशी जाणारी पहिली स्त्री. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही कुचेष्टा, अवहेलना, अपमान सहन करीत हाती घेतलेले वैद्यकीय शिक्षण जिद्दीने पूर्ण करणारी स्त्री म्हणजेच आनंदीबाई आणि अशा यशस्वी स्त्रीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून तिला साथ देणारे गोपाळराव. वयाच्या नवव्या वर्षी आनंदीबाईचं लग्न गोपाळराव जोशी यांच्याशी झालं. ज्या काळात स्त्री शिक्षण म्हणजे व्यभिचाराला आमंत्रण मानले जायचे अशा कठीण काळी “मी आनंदीबाईंना मनाप्रमाणे शिकवेन” अशी अट गोपाळरावांनी लग्नाआधी आनंदीबाईच्या वडिलांना घातली होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्कारून गोपाळरावांच्या सोबतीने आनंदीबाई फक्त शिकल्याच नाहीत तर आणि भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान त्यांनी मिळवला. त्यांचा हाच ध्येयवेडा प्रवास ‘आनंदी गोपाळ’ मध्ये पाहायला मिळणार आहे.

झी स्टुडिओज् चे मंगेश कुलकर्णी, नम: पिक्चर्सचे किशोर अरोरा आणि शारीन मंत्री केडिया व फ्रेश लाईमचे अरुणवा जॉय सेनगुप्ता आणि आकाश चावला यांनी चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. समीर विद्वांस यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात गोपाळ आणि आनंदी यांच्या भूमिकेत अभिनेता ललित प्रभाकर आणि भाग्यश्री मिलिंद ही जोडी बघायला मिळणार आहे. याशिवाय चित्रपटात गीतांजली कुलकर्णी, क्षिती जोग, योगेश सोमण, बाल कलाकार अंकिता गोस्वामी आणि अथर्व फडणीस यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा करण शर्मा यांची असून, संवाद इरावती कर्णिक यांचे आहेत. चित्रपटाचे संकलन चारू श्री रॉय यांनी केलंय. सुनील निगवेकर आणि निलेश वाघ यांचे कला दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले असून सौरभ भालेराव यांचे पार्श्वसंगीत आहे. आकाश अग्रवाल यांनी छायाचित्रणातून आनंदी गोपाळचे भावविश्व चितारले आहे.

आनंदी गोपाळ चित्रपटामध्ये ऋषिकेश-सौरभ-जसराज ह्या त्रयीच्या संगीताने सजलेली पाच गाणी आहेत आणि सध्या सोशल नेटवर्कवर रंग माळियेला हे गाणं तुफान लोकप्रिय झालं आहे. काही दिवसांतच लाखाच्यावर हिट्स मिळवलेल्या या गाण्यांबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. यातही विशेष उल्लेख करावा लागेल तो ‘आनंद घना’ आणि ‘तू आहेस ना’ या गाण्यांचा. यातील सर्व गाणी वैभव जोशी यांनी शब्दबद्ध केली आहेत तर केतकी माटेगावकर, शरयू दाते, आनंदी जोशी, प्रियांका बर्वे, जसराज जोशी, ऋषिकेश रानडे, राहुल देशपांडे, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, रोहित राऊत यांच्या सोबतीने पं. संजीव अभ्यंकर यांनी ती स्वरबद्ध केली आहेत. झी म्युझिकच्या द्वारे ही गाणी श्रोत्यांच्या भेटीस आली आहेत.

हा चित्रपट येत्या १५ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. मागील वर्षात “नाळ” सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देणा-या झी स्टुडिओजची निर्मिती आणि प्रस्तुती असलेला “आनंदी गोपाळ” प्रेक्षकांची मने जिंकुन घेण्यास सज्ज झालाय.   

दीनानाथ घारपुरे ,, ९९३०११२९९७ 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here