महिलांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील बेळोंडगी गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.गावची ग्रामीण पाणीपुरवठ्याची योजना देखील कुचकामी ठरली आहे.नागरिकांना पाण्यासाठी भंटकती करावी लागत आहे. मंगळवारी जतचे तहसिलदार दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी बेळोंडगीत येणार असल्याचे समजताच गावातील वैतागलेल्या महिलांनी टँकर मागणीसाठी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्या नजमा मकानदार, वनिता पाथरूट, कस्तुरी मनुर, सातव्वा बासरगाव, सुभद्रा सुतार, सावित्री कोळी, आदीसह गावातील शंभराहून अधिक महिलांनी ग्रामपंचायती समोर धरणे आंदोलन केले.बेळोंडगी गावापासून चार किलोमीटर अंतरावर तलाव आहे. त्यामध्ये काही प्रमाणात पाणी शिल्लक आहे. मात्र,पाणी साठा मृतसंचय खाली आहे.तलावाच्या शेजारीच पाणी योजनेची विहिर आहे. त्यातून गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी पं.स. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून 79 लाखाची भारत निर्माण योजना सन 2008-09 मध्ये मंजूर आहे.त्याचेही काम अद्यापपर्यत रखडले आहे.दहावर्षापासून अर्धवट योजना गावासाठी कुचकामी ठरली आहे.योजना अर्धवट राहण्याला पाणीपुरवठा विभाग कारणीभूत आहे.ही योजना असल्याने टँकर देणाला प्रशासन चालढकल करत आहे.असा आरोप ग्रामस्थांचा आहे.पंरतू योजना पुर्ण नसल्याने सध्या पाणी आणायचे कोठून असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे.ग्रामपंचायतीने टँकर मागणी डिंसेबर महिन्यात केली आहे.अर्धवट योजनेतून पाणी गावाला मिळणे शक्य नसताना प्रशासनाने गावात टँकर सुरू करण्याकडे चाल-ढकल केली जात आहे. मात्र, खरी परिस्थिती शासनाने व प्रशासनाने समजून घेतली नाही किंवा प्रशासनाला समजून घ्यायला वेळ नाही.अशी भूमिका येथील महिलांनी व्यक्त केली.
बेंळोडगीला तातडीने टँकर सुरू करा या मागणीसाठी ग्रामपंचायतीवर महिलांनी मोर्चा काढला.





