

जत,प्रतिनिधी : जत नगरीची ग्रामदेवता महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री.रेणुका देवी, यल्लमाची यात्रा रविवार दि.30 डिसेंबर 2018 ते शुक्रवार दिं.4 जानेवारी 2019 पर्यंत भरत आहे.यात्रेची तयारी पुर्ण झाली आहे.यात्रेत स्टॉल,खेळणी,चहा,मेवामिठाई,थियेटर,पाळणे मांडणीची लगभग सुरू अंतिम टप्यात आली आहे.सर्व यंत्रणा नियोजनाच्या कामाला लागल्या आहेत. यात्रेचे तीन मुख्य दिवस असून सोमवार दिं. 31 डिसेंबर रोजी गंधोटकीचा दिवस आहे. मंगळवार दिं.1 जानेवारी 2019 रोजी नैवेद्याचा दिवस आहे. तर बुधवार दिं.2 जानेवारी रोजी मुख्य किचाचा दिवस आहे. तर 4 जानेवारी रोजी अमावस्या असल्याने या दिवशीही यात्रा भरते.यात्रेसाठी महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात.नवसाला पावणारी देवी असा जतच्या श्री. यल्लमा देवीचा लौकिक आहे. श्री. यल्लमा देवी प्रतिष्ठान जत व प्रशासनाने यात्रेकरूसाठी सर्व त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे अश्वासन यात्रा कमिटीने बोलावण्यात आलेल्या बैठकित दिले होते.पण या अश्वासनाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यात्रेसाठी येणारे मार्गावर जागोजागी मोठ्ठे खड्डे पडले आहेत. ते खड्डे अजुनही सार्वजनिक बांधकाम विभागाने मुजवले नाहीत. यात्रेसाठी आलेली वाहने कोणत्या मार्गाने यात्रेत येणार व यात्रेतून बाहेर जाणार त्या मार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. तसेच यात्रेकरूंची वाहने विद्यानगर येथील ज्या रस्त्यावरून बाहेर काढलीच आहेत.त्या रस्त्यावर मुरूम टाकून रस्त्यांची तात्पुरती दुरूस्ती करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांनी देऊनही त्यांच्या आदेशाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने व जत नगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने यात्रेत येणाऱ्या व बाहेर जाणा-या रस्त्याच्या दुरूस्तीचा प्रश्न तसाच राहिला आहे. यात्रेसाठी आलेल्या भाविकांसाठी करण्यात आलेल्या स्वच्छता गृहाची संख्याही कमीच आहे.यात्रेतील जनावरांसाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पिण्यासाठी पाण्याची सोय केली आहे. चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री. तुकाराम महाराज यानी यात्रेकरूंसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून त्यांच्या मठाच्या वतीने यात्रेकरूसाठी एकशे एक सिंटेक्स टाक्या व चार ट्रकरची सोय उपलब्ध करून दिली आहे. यात्रेत आलेल्या भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये व ही यात्रा चांगल्या प्रकारे व सुरळीत पार पडावी यासाठी जतचे उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे, तहसीलदार सचिन पाटील, जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत हराळे, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे, पोलीस निरीक्षक अशोक भवड, यल्लमा देवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे, उपाध्यक्षा श्रीमती ज्योत्स्नाराजे अनिलराजे डफळे आदिनी यात्रा परिसरात नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. या नियंत्रीत कक्षाच्या व सीसीटिव्हीच्या माध्यमातून यात्रेत होणारे प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवले जाणार आहे.