जाड्डरबोबलाद/उमदी : जाड्डरबोबलाद ता.जत येथील शेतकरी श्रीशैल रामनिंग मडूर (वय-46) यांनी कर्जास कंटाळून व शेतीस पाणी पुरत नसल्याच्या नैराश्यातून गळपासाने आत्महत्या केली.घटना गुरूवारी मध्यरात्री घडली.याबाबत श्रीशैल यांचा मुलगा काशिनाथ मडूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमदी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी श्रीशैल मडूर यांची मडूरवस्ती येथे शेतजमीन आहे.शेतीत पिकासाठी सोसायटी,खाजगी कर्ज काढले आहे.गेल्या तीन,चार वर्षापासून पावसाने बगल दिल्याने शेतीतून काहीही उत्पन्न आलेले नाही.यंदाही पिक आले नाही.बोअरवेलला असलेले पाणीही गेले आहे.सध्या मजूरीही नाही त्यामुळे जगायचे कसे,व कर्ज कसे फेडायचे या विवेंचनात श्रीशैल होते.त्या निराश्यातून शनिवारी मध्यरात्री घरासमोरील लिंबाच्या झाडास गळपास लावून आत्महत्या केली.श्रीशैल यांना आणखीन एक भाऊ आहे.दोघेही स्वतंत्र राहतात.आई-वडीलाचे निधन झाले आहे.पत्नी,3 मुली,1मुलगा असा परिवार आहे.श्रीशैलने जीवन यात्रा संपविली मात्र पाठीमागे पत्नी,मुलाच्या समोर अग्निदिव्य उभे केले आहे. त्यांनी कसे जगायचे असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे.
जाड्डरबोबलाद परिसरात दुष्काळाची मोठ्या प्रमाणात झळ पोहचली आहे.कायम अवर्षण ग्रस्त या भागात शेती कधीही सलग दोन वर्षे पिकली नाही.कायम दुष्काळ, व पाणी टंचाईने येथील शेतकरी विकलांग झाला आहे. शासनाने गंभीर दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र तालुक्यात सहा पाण्याच्या टँकर पलिकडे उपाययोजना सुरू नाहीत.जनावरांना चारा नाही,अन्नधान्याचे तुटवडा,त्यामुळे शेतकरी मरणाला कवटाळत आहे.आता तरी शासनाने जागे व्हावे असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.





