जत,(प्रतिनिधी):जत तालुक्यातील पूर्वभागाला संजीवनी ठरणार्या तुबची-बबलेश्वर योजनेतून 55 गावांना पाणी देण्यास कर्नाटक सरकार तयार असून या संदर्भात महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य करार करण्यासाठी दोन्ही राज्याच्या पाटबंधारे मंत्र्यांची लवकरच बैठक घेऊ, अशी ग्वाही कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी दिली.मंगळवारी बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनात जतच्या सर्वपक्षीय शिस्टमंडळाने मुख्यमंत्री कुमारस्वामी, पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांची जमखंडीचे काँग्रेसचे आमदार आनंद न्यामगोंडा यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. सभापती तम्मनगौडा रवी, बसवराज पाटील, रमेश पाटील, संजय तेली, अशोक बन्नेनावर, सोमनिंग बोरामणी, चंद्रकांत गुडोडगी यांच्यासह 20 गावातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले, जत तालुक्याच्या काही गावांना कर्नाटक सरकार तुबची योजनेचे पाणी देण्यास तयार आहे. यासाठी दोन्ही राज्यांच्या पाणी वाटपाचा करार व्हायला हवा. तुबची योजना कर्नाटक सरकारने कार्यान्वित केली आहे, हे पाणी महाराष्ट्राला कशा पद्धतीने देता येईल, यातील गावांना होणार आहे. या संदर्भात दोन्ही राज्याच्या पाटबंधारे मंत्र्याची बैठक घेऊ, असे सांगून जतच्या दुष्काळाची त्यांनी माहिती घेतली. तसेच कर्नाटक आपल्या पाठीशी राहील, अशी ग्वाही दिली.
मंत्री डी.के. शिवकुमार यांनी मारला शेरा कर्नाटक पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी शिष्टमंडळाकडून तुबची योजना, सीमावर्ती भाग याची सविस्तर माहिती घेतली. तसेच आमदार आनंद न्यामगोडा यांच्याशी चर्चा करून त्यांनी जतला पाणी देण्यासंदर्भात प्रशासनाने अहवाल द्यावा, असा शेरा मारला. मंत्री शिवकुमार यानां तम्मनगौडा रवी, बसवराज पाटील यांनी निवेदन सादर केले यावेळी बसवराज पाटील व शिक्षण सभापती रवी पाटील यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याशी चर्चा करून कृती आराखडा सादर केला.
तुबची योजनेचे पाणी सध्या तिकोटा, यत्नाळ, घोणसगी इथपर्यंत आले आहे. त्यामुळे यातील दोन टीएमसी पाणी महाराष्ट्रच्या जत तालुक्याला दिल्यास पूर्व भागातील 64 गावांच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागणार आहे. हे पाणी नैसर्गिक प्रवाहातून जतला देणे शक्य आहे. तसे झाल्यास या भागातील 13 साठवण तलाव, साखळी बंधारे भरण्यास मदत होणार आहे. शिवाय 13 हजार हेक्टरवरचे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, याच पाण्याचा फायदा कर्नाटकच्याही काही गावांना होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक दुहेरी फायद्याची ही योजना कार्यान्वित करण्यासाठी कर्नाटकने पुढाकार घ्यावा, अशी विनंती शिष्टमंङळाने यावेळी केली. जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना भावनिक साद घातली. तुमचे वडील पंतप्रधान असताना संबंध कर्नाटकाला पाणी दिले, तुम्ही आता गडीनाड विभागाला पाणी द्यावे, अशी मागणी करीत जतची भौगोलिक माहिती दिली.
आपुलकीने चर्चा; सकारात्मकता दर्शविली ज्येष्ठ नेते बसवराज पाटील यांनी अनेक वर्षे जनता पक्षात काम केले. शिवाय कर्नाटकाशी असणारा स्नेहही व्यक्त केला. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनीही त्याच्याशी आपुलकीने चर्चा करत जतच्या पाण्यासंदर्भात प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
जत तालुक्याला मदत देण्याचे अभिवचन जत तालुक्याचा सत्तर टक्के भाग कानडी भाषिक आहे.त्यामुळे सीमाभागात राहणार्या लोकांविषयी नेहमीच येथील जनतेने एक- मेकांविषयी सहानभूती दाखवली आहे. मंगळवारी जतच्या पाण्याविषयी बेळगावच्या विधिमंङळात काँग्रेस आमदार आनंद न्यामगोंड विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील, आमदार यशवंत पाटील, आमदार एम. वाय. पाटील, आमदार मधू बंगारेप्पा यांनीही पुढाकार घेत दुष्काळी जत तालुक्याला मदत देण्याचे अभिवचन दिले.
बेळगाव येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांची भेट घेत जतच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.