जत,प्रतिनिधी : जत तालुक्याच्या पूर्व भागाच्या सीमेवर कर्नाटक राज्यातून पाणी आले आहे. विजापूर जिल्ह्यातील यत्नाळ या गावातील बंधाऱ्या पर्यत पाणी पोहचले आहे.जत तालुक्याच्या सीमेपासून हे ठिकाण केवळ दोन किलोमीटर अंतरावर आहे.जत तालुक्यात हे पाणी वळविल्यास पूर्व भागातील 40 गावांचा पाणीप्रश्न मिटू शकतो.कर्नाटकला महाराष्ट्रातुन पाणी देताना एक टीएमसी पाणी जत तालुक्याला दिले पाहिजे असे पत्र आमदार विलासराव जगताप यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे.त्याशिवाय या पाणी योजनेला मंजुरी देण्यासाठी खा.संजयकाका पाटील,आ.जगताप यांचा या भागाचा दौरा करणार होते.परंतु खा.पाटील यांना मुंबईला जावे लागल्याने हा दौरा रद्द झाल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी दिली आहे.
पाटील पुढे म्हणाले की, येत्या दोन दिवसात खा.पाटील ,आ. जगताप व तालुक्यातील भाजपाचे शिष्टमंडळ कर्नाटकातील बंगलोर येथे मुख्यमंत्री कुमारस्वामी,जलसंपदा मंत्री,यांची भेट घेणार आहेत. या भेटीत त्यांना यत्नाळ (जिल्हा-विजापूर)या गावी आलेले पाणी जत तालुक्याला कसे देता येऊ शकते याबाबत माहिती दिली जाईल.यावर उभयपक्षी तातडीने निर्णय घेऊन जत तालुक्यातील पूर्व भागातील 40 गावांना पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.तसेच माडग्याळ सह आठ ते दहा गावांना म्हैसाळ योजनेचे पाणी पुरवठा करण्यासाठीच्या कॅनॉलच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. यासाठी ही पाठपुरावा केला होता.साधारण येत्या दोन महिन्यांत ही कामे पूर्ण होऊन माडग्याळ परिसरात म्हैसाळ योजनेचे पाणी येणार आहे. जत तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वच गावातील शेती सिंचनाखाली आणण्यासाठीच्या प्रयत्नाला यश येत आहे.असेही पाटील यांनी सांगितले.