जत : पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. गावेच्या गावे स्थलांतरित होण्याची भीती आहे. मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे पाण्याचा प्रश्न वेळेत सोडवण्यात अपयश येत असून तोंड लपवून पळायची वेळ आमच्यावर येत आहे. पाण्यासाठी भीक मागण्याची वेळ आली आहे. सरकारने आमच्या लोकांचा जीव वाचवावा, अशा हताशपणे गाऱ्हाणे मांडत भाजप जेष्ठ नेते एकनाथ खड़ यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला.विधानसभेत दुष्काळावरील चर्चेत भाग घेताना एकनाथ खडसे यांनी राज्यातील आणि जळगाव भागातील पाणीटंचाईच्या परिस्थितीवर आणि समस्या निवारणातील दप्तरदिरंगाईवर प्रहार केले. तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार वाढवा. मंत्रालयापर्यंत जाण्याची वेळ आणू नका, दुष्काळनिवारणाच्या कामात चुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत, अशा मागण्याही खडसे यांनी केल्या.दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा हेच माध्यम आहे. मात्र अनेक ठिकाणी ग्रामसेवकांपासून ते प्रशासनातील विविध पदे मोठय़ा प्रमाणात रिक्त आहेत, याकडे लक्ष वेधत माणसांशिवाय दुष्काळाची कामे कशी करणार, असा सवाल खडसे यांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनी केला तर अनेक कामे आमच्या अधिकारात नाहीत, इतर विभाग आमचे ऐकत नाहीत, असे उत्तर येते ही गंभीर बाब असल्याची टीका खडसे यांनी केली.पिण्याच्या पाण्यावाचून गावे स्थलांतरित होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, तर अनेक गावांत पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. सरकारने पाण्याचा प्रश्न सोडवावा, असे खडसे म्हणाले.