बेळोंडगी,वार्ताहर: उमदीसह परिसरात गेल्या काही दिवसापासून महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे विजेचा खेळखंडोबा झाल्याने सामान्य जनतेसह शेतकरी हैराण झाला आहे.तातडीने विजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा विज वितरण कंपनीस टाळे ठोकण्याचा इशारा कॉग्रेस नेते निवृत्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिला.तसे निवेदन उमदी पोलिस ठाणे,महावितरण कंपनीला दिले आहे. संख्या सब स्टेशन मधून उमदीसह परिसराला विज पुरवठा होतो.गेल्या महिन्याभरापासून भारनियमनच्या नावाखाली सतत विजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे पिण्याच़्या पाण्यासह अनेक कामे खोंळबत आहेत.टँकरच्या पाण्यावर जगविलेली बागा,पिकांना वेळेत पाणी देता येत नाही त्यामुळे पिके,बागा वाळत आहेत.सर्वाधिक अडचण नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची होत आहे. पाणीपुरवठा मोटारीचा विजपुरवठा सतत खंडित होत आहे.त्याशिवाय विजेअभावी बँका,शासकीय कार्यालयांची कामे खोंळबत आहेत.त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे.विज वितरण कंपनीने अामचा अंत पाहू नये,तातडीने परिसरातील विजपुरवठा भारनियमन मुक्त करा अन्यथा विज वितरण कंपनी टाळे ठोकू,तीव्र अंदोलन करू असा इशारा शिंदे यांनी दिला.यावेळी बंडा शेवाळे,अनिल शिंदे,कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
उमदी : विजपुरवठा सुरळीतकरावा या मागणीचे निवेदन उमदी पोलिस व महावितरणला देण्यात आले.