हिवाळ्यातच उन्हाची तीव्रता हळूहळू जाणवू लागली आहे.
संख,वार्ताहर:जत तालुक्यात ऑक्टोंबर महिन्याच्या दुस-या आठवडय़ातच उन्हाची तीव्रता हळूहळू जाणवू लागली आहे. ही तीव्रता येणा-या आगामी महिन्यात मोठय़ा प्रमाणात वाढून याचा फटका तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या गाव वाडय़ांमधील नैसर्गिक जलस्त्रोतांना बसणार आहे. या वर्षी देखील पाणीटंचाई रौद्ररूप धारण करण्याची शक्यता असून तयार करण्यात आलेल्या कृती आराखडा गतीने तयार करणे गरजेचे आहे.दर वर्षी जत तालुका फेब्रुवारी ते जूनचा पहिला आठवडा हा तहानलेलाच राहत असल्याचे गेले अनेक वर्षापासूनचे चित्र कायम आहे. तसेच जिल्ह्यामध्ये पहिला टँकर धावण्याची परंपरा देखील या तालुक्याकडे आहे.यंदा ती परिस्थिती ऑक्टोंबर महिन्यात उद्भवली आहे.
पाणीपुरवठय़ाशी निगडित असलेल्या अनेक पाणी योजना राबवून देखील उन्हाळा या हंगामात प्रशासनाला टँकरद्वारे गाव, वाडय़ांची तहान भागवावी लागते. त्यामुळे दरवर्षी अनेक कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवून देखील पाणीटंचाईचे ग्रहण गेले अनेक वर्ष सुटतच नसल्याचे वास्तव आहे.काही गावे ही भौगोलिकदृष्टय़ा दुष्काळी पट्ट्यात वसली असल्याने त्या ठिकाणी असलेले नैसर्गिक जलस्त्रोत आटत जात असल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. काही ठिकाणच्या ग्रामस्थांना तर पाण्यासाठी दाही दिशा भटकून तहान भागवावी लागत असल्याचे गेल्या अनेक वर्षापासूनचे चित्र आजही कायम आहे.