जत तालुक्यातील तलाव कोरडे,पाणी टंचाई तीव्र : पाटबंधारे विभागाचा भोगळ कारभार

0
2

संख,वार्ताहर :जत तालुक्यातील पुर्व भागातील अत्यल्प पाऊसाने व पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष व पाण्याचा अवाजवी उपसा यामुळे जत तालुक्यात ऐन हिवाळ्यात ऑक्टोंबर महिन्यातच पाण्याची पातळी कमी झाल्याने 26 तलावांपैकी अनेक तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत. 2 मध्यम प्रकल्पांपैकी संख, दोड्डनाला मध्यम प्रकल्पातील पाणी अखेरीला आले आहे.निम्यावर तलावांची पाणी पातळी मृतसंचयाखाली गेली आहे. म्हैसाळ योजनेतील पाणी तलावात सोडल्याने पश्‍चिम भागातील तलावांत पाणीसाठा बर्‍यापैकी आहे. पण पावसाच्या स्रोतावर अवलंबून असलेल्या तलावातील पाणीसाठा नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत संपुष्टात येणार आहे. पाण्याचा उद्भव साठा संपत आल्याने पुढील जानेवारी ते मे महिन्यापर्यंत दिवस कसे काढायचे? हा प्रश्न आ वासून उभा आहे. सध्याच तालुक्यात पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची टंचाई वाढू लागली आहे. तालुक्यामध्ये दुष्काळ हा पाचवीला पूजलेला आहे. गेल्या सहा वर्षापासून पाऊस अत्यल्प पडल्यामुळे पाण्याची पातळी 700 ते 800 फुटापर्यंत खाली गेली आहे. पाण्याअभावी द्राक्षे, डाळिंबबागा काढून टाकाव्या लागल्या आहेत. विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या चार्‍याची समस्या निर्माण झाली आहे. यावर्षी मान्सून पावसाने जुलै महिन्यात थोड्या प्रमाणात हजेरी लावली होती. परतीच्या पावसानेही दडी दिली.तलावे, प्रकल्पातील पाणीसाठय़ाचा अवाजवी उपसा केला आहे. पिण्यासाठी पाणी अरक्षित ठेवण्याची आवश्यकता होती. पण पाटबंधारे विभागातील अधिकार्‍यांच्या संगनमताने पाणी उपसा केला आहे. उपसा रोखण्यासाठी जत व संख पाटबंधारे विभागात कर्मचारी संख्या कमी आहे. अनेक वर्षापासून जागा रिक्त आहेत.त्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

कोरडा पडलेला तलाव

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here