जत,(प्रतिनिधी):जत तालुक्यात गेल्या वर्षभरापासून दलितांवरच्या अत्याचारात वाढ झाली आहे. दलितांसाठी येणार्या सुविधांचा निधी खर्ची केला जात नाही.यासह जत तालुका दुष्काळी जाहीर करावा आणि त्याची अंमलबजावणी तात्काळ करावी,या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने मंगळवार दि. 30 ऑक्टोबर रोजी जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कांबळे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
श्री. कांबळे म्हणाले, जत तालुक्यात अलिकडच्या वर्षभरात दलित समाजावर सातत्याने अत्याचार होत आहेत. घरे पेटवणे, दमात घेणे, मारहाण करणे, अपमानास्पद वागणूक देणे, गरीब लोकांच्या जमिनी बळकावणे असे प्रकार वाढीस लागले आहेत. याशिवाय तालुक्यात वर्षानुवर्षे तळ ठोकून बसलेले काही मुजोर सरकारी अधिकारी दलितांना साप्त्नपणाची वागणूक देत आहेत. तालुक्यात दलितवस्ती सुधार योजनेतून सुमारे सात कोटींचा निधी आला आहे. हा निधी परत जाण्याची वेळ आली आहे,पण तरीही तो खर्ची टाकला जात नाही. दलितवस्तीचा विकासच करायचा नाही, असाच याचा अर्थ होतो. याबाबत पक्षाच्यावतीने वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. शिवाय नुकत्याच झालेल्या आमसभेतही यावर आवाज उठवण्यात आला. यावर जोरदार चर्चा झाली.पण पुढे कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत आहे.
30 तारखेला सकाळी अकरा वाजता मार्केट यार्ड येथून मोर्चेला सुरुवात होईल.या मोर्चाचे नेतृत्व सांगलीचे नगरसेवक व रिपाइंचे जिल्हा नेते विवेक कांबळे, जगन्नाथ ठोकळे, डॉ. प्रितीश जळगावकर, रुपेश शिंदे, संजय एम. कांबळे, प्रदीप सूर्यवंशी आदी करणार आहेत. यावेळी विविध मागण्या मांडणार आहोत.यात प्रामुख्याने जत तालुका दुष्काळी जाहीर करा आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करा.मागेल त्याला पाण्याचा टँकर द्या, मराठा, लिंगायत, मुस्लिम, धनगर समाजाला आरक्षण द्या. बाज येथे झालेल्या मातंग समाजाच्या लोकांवरच्या अत्याचाराची चौकशी करून कारवाई करावी.मोरबगी,बोर्गी,बालगाव येथे दलितांची घरे पेटवून दिल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याची निपष्पातीपणे चौकशी करावी. यात जबाबदार असणार्या महसूल, पोलिस अधिकार्यांची चौकशी व्हावी.
तालुक्यात सुरू असलेली वाळू तस्करी मोडीत काढावी,ग्रामपंचायतींकडे आलेला 15 टक्क्यांचा निधी दलितवस्तीसाठी खर्च करावा.पंचायत समितीचे शाखा अभियंता ए.ए. शेख यांनी दलितवस्ती निधीत केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी. उमदी व माडग्याळ गावांना अन्य गावे जोडून दोन नवे तालुके निर्माण करावेत.जत शहरातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे.हे रस्ते नव्याने करण्यात यावेत, अशा मागण्या असल्याचे श्री. कांबळे यांनी सांगितले.
यावेळी संजय पाटील, राजेश वर्धा, प्रशांत ऐदाळे, नारायण कदम,सुनील वाघमारे, संभाजी चंदनशिवे, गुर्गाप्पा ऐवळे, राहूल चंदनशिवे, सोमनाथ कांबळे, अनिल कांबळे आदी उपस्थित होते.