जत,प्रतिनिधी:महसूल विभागाने वाळू तस्करी करताना पकडलेला ट्रक तहसील कार्यालय आवारातून पळविल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. ट्रक मालक सचिन विष्णू कुंभार रा.शिरढोण यांने पथकातील अधिकाऱ्यांला धक्काबुकी केली. प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी, निगडी खुर्दकडून बेकायदा वाळू वाहतूक करणारा ट्रक जतकडे येत असल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांना मिळाली होती. त्यांनी मंडल अधिकारी मोरे यांना माहिती देऊन संबधित ट्रक (एमएच-10,एडब्लू-3189) पकडण्याचे आदेश दिले. मोरे, बिंळूरचे तलाठी बबनराव शिंदे, येळदरी कोतवाल नदाफ यांनी सापळा लावून ट्रक पकडला. त्यात विना परवाना वाळू भरली होती. तो ट्रक कारवाईसाठी जत तहसील कार्यालयात आणण्यात आला. ट्रक मालक सचिन कुंभार याने मंडल अधिकारी मोरे व पथकातील इतरांना धक्काबुकी करून ट्रक कवटेमंहकाळच्या दिशेने पळवून नेला. याबाबत मोरे यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे.शासकीय कामात अडथळा, अधिकाऱ्यांना धक्काबुकी अादी कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.





