नवी दिल्ली: उत्तुंग व्यक्तिमत्व… सर्वसमावेशक नेतृत्व… अमोघ वक्तृत्वाचे धनी आणि अमेरिकेच्या नाकावर टिच्चून भारताची आण्विक तटबंदी भक्कम करणारे भारताचे माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ अटलबिहारी वाजपेयी यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक जीवनापासून दूर असलेल्या वाजपेयींची प्रकृती वयोमानानुसार खालावली होती. मागील 9 आठवड्यांपासून त्यांच्यावर दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात उपचार सुरू होते. कालपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेल्यानं रात्री त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. वाजपेयींच्या निधनामुळं अवघा देश हळहळला असून त्यांच्या रूपानं भारतीय राजकारणातील समन्वयी युगाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होत आहे.स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासात स्व-कर्तृत्वावर वेगळी उंची गाठणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी वाजपेयी एक होते. भारतीय जनता पक्षाचे ते पहिले पंतप्रधान होते. गेले सुमारे दशकभर राजकारणापासून दूर असूनही राजकीय वर्तुळात, विशेषत: भाजपमध्ये ते सतत चर्चेत होते. इतके त्यांचे नेतृत्व प्रभावशाली होते. कवी मनाच्या वाजपेयींबद्दल सर्वच पक्षांच्या नेत्यांमध्ये आत्मीयतेची भावना होती. डझनभर पक्षांना सोबत घेऊन त्यांनी चालवलेले आघाडी सरकार हा भारताच्या राजकीय इतिहासातील चमत्कारच ठरला होता. वाजपेयी यांनी देशाच्या राजकारणात अनेक महत्त्वाची पदं भूषवली. विरोधी पक्षात असतानाही त्यांनी देशहितासाठी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारनं त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. त्यांच्या रूपानं भारतीय राजकारणातील एक पितृतुल्य व्यक्तिमत्व व महान नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.