सांगली: सांगली जिल्हा विकासाच्या सर्व टप्प्यांवर अग्रेसर ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष व खासदार संजय पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार मोहनराव कदम, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली व राष्ट्रगीत झाले. त्यानंतर पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी जनतेला शुभेच्छा संदेश दिला.
शुभेच्छा संदेशात स्वातंत्र्यसैनिक आणि शहिदांच्या प्रती नतमस्तक असल्याचे सांगून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा ऐतिहासिक आणि सर्वात मोठा निर्णय राज्य शासनाने घेतला. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यातून 1 लाख, 46 हजार शेतकऱ्यांना 407 कोटी, 39 लाख इतक्या रकमेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच सहकार विभागाच्या ई-नाम योजनेतून ऑनलाईन सौदे करून आजपर्यंत 77 लाख 53 हजार रूपये किंमतीचा 5 हजार 41 क्विंटल बेदाणा विक्री झाली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून सन 2017-18 मध्ये राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 2 लाख 455 सभासदांच्या खात्यावर 28 कोटी 62 लाख रुपये जमा केले आहेत.
महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाचा आढावा घेताना पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, या अभियानातून गेल्या 3 वर्षात 421 गावांमध्ये 17 हजार 336 कामे पूर्ण झाली आहेत. या गावांमध्ये 87 हजारहून अधिक टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे 45 हजार हेक्टर्सहून अधिक संरक्षित क्षेत्र सिंचनाखाली येत आहे. सन 2018-19 मध्ये जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधून 103 गावे निवडली आहेत.
मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत साडेचार हजारहून अधिक लाभार्थीना सुमारे 20 कोटी रुपये इतके अनुदान वितरीत केले आहे. त्यातून 5 हजार 705 टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला असल्याचे सांगून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, त्याव्दारे 2 हजार 852 हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण झालेले आहे. उन्नत शेती समृद्ध शेतकरी कृषि यांत्रिकीकरणातून जिल्ह्यात मार्चअखेर 1 हजार 789 लाभार्थींना 12 कोटी, 27 लाख रुपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे. जत तालुक्यात बालगाव आश्रम परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाचे जागतिक स्तरावर रेकॉर्ड झाल्याबद्दल त्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले.
सांगली जिल्ह्यातील कृष्णा कोयना उपसा जलसिंचन प्रकल्पांतर्गत ताकारी व म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या उरलेल्या कामांचा प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेत समावेश झाला असल्याचे सांगून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, या कामांसाठी 2 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, कामे वेगाने होत आहेत. अनेक दिवसांपासून रखडलेल्या टेंभू उपसा सिंचन योजनेचा समावेश केंद्र शासनाच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेत करण्यात आला आहे. प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी 1200 कोटी रुपयांचा भरीव निधी देण्यात आला आहे. ही कामे एक वर्षात पूर्ण करण्याबाबत त्यांनी सूचित केले.
पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, सांगली जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अशा उपसा सिंचन योजनांसह महाराष्ट्रातील सर्व शासकीय उपसा सिंचनासाठी येणाऱ्या वीजबिलापोटी 19 टक्के रक्कम लाभधारकांकडून व 81 टक्के रक्कम शासन देणार असल्याने या निर्णयामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, पाटबंधारे प्रकल्पासाठी बंदिस्त नलिका वितरण प्रणाली धोरणाच्या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील टेंभू, ताकारी व म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या वितरण प्रणालीची कामे बंदिस्त नलिकेद्वारे होणार आहेत, त्यामुळे प्रकल्पाच्या शेतजमीन संपादनात आणि खर्चात मोठी बचत होत आहे.
पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, मराठा आरक्षणासाठी शासन सकारात्मक असून त्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतिगृहे सुरू करण्याचा क्रांतिकारी निर्णय शासनाने घेतला असून, सांगली येथेही येत्या 8 दिवसात दोन वसतिगृहे सुरू करण्यात येतील. राज्य शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे कर्ज व्याज परताव्याच्या योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेत सांगली जिल्ह्यात एकूण 1352 लाभार्थी पात्र ठरले आहेत. त्यातील 28 प्रकरणांना गेल्या 2 महिन्यात कर्ज वितरण केले आहे.
पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 6 राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरीकरणाचे काम सुरू होणार असून त्यामध्ये सर्व प्रथम रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग 166 मध्ये 26 गावे समाविष्ट आहेत. त्यापैकी 10 गावांचे निवाडे जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गकडून नुकसान भरपाई रक्कम 94.11 कोटी प्राप्त होताच वाटप सुरू करण्यात येणार आहे. नॅशनल हायवे क्रमांक 266 कराड-तासगाव-कवठेमहांकाळ-जत मार्गे विजापूर याचे सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील रस्त्यांचे विस्तारीकरण सुरू आहे. उर्वरित चारही राष्ट्रीय महामार्गांच्या कामास लवकरच सुरूवात होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी असंसर्गजन्य रोग नियंत्रण व तंबाखूनियंत्रण कार्यक्रम प्रभावी अंमलबजावणीकरिता तंबाखूमुक्तीची जिल्हा पुनर्वसन अधिकारी अमृत नाटेकर यांनी उपस्थितांना दिली. तसेच, बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेच्या प्रसिद्धीसाठी तयार केलेल्या स्टीकरचे अनावरणही पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंग्लंड येथील राष्ट्रकुल स्पर्धेत फेन्सिंग या प्रकारामध्ये चमकदार कामगिरी करून देशाला सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल गिरीश जकाते या क्रीडापटूचा सत्कार करण्यात आला. तसेच, राज्यस्तरीय गुणवत्ता यादीतील 15 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तासगाव तालुक्यातील चिखलगोठण येथील वारांगणांचा सहभाग, वारांगणाच्या प्रश्नाबाबत केलेले कार्य, मतदार जागृती व स्वच्छ भारत अभियानांतर्गत केलेले उल्लेखनीय कार्य याबद्दल पत्रकार दीपक चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, सांगली फेस्टीव्हलसारखे 16 यशस्वी उपक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल राजेश शहा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते चांदोली अभयारण्य प्रकल्पबाधित लाभार्थींना प्लॉटवाटप आदेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अँड्रॉईड ऍ़पचा शुभारंभ आणि लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ध्वजारोहणाच्या या सोहळ्यास पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, अप्पर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण, अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, सर्व उपजिल्हाधिकारी, जिल्ह्यातील मान्यवर, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्य सैनिक यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले.