जत,प्रतिनिधी: राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम सन 2018-19 अंतर्गत जत तालुक्यासाठी 222 कोटी 64 लाख रुपये इतक्या कामाच्या आराखड्यास मंजुरी मिळाली आहे.अशी माहिती आमदार विलासराव जगताप यानी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.
राज्य स्तरीय राष्ट्रीय पेयजल मंजुरी समितीची बैठक 29 जून 2018 रोजी मंत्रालय मुंबई येथे झाली होती.या बैठकीत जत तालुक्यातील 24 नळ पाणी पुरवठा योजनेच्या आराखड्यास मंजुरी मिळाली होती. त्यापैंकी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सांगली यांनी जत तालुक्याच्या पूर्व भागातील 75 गावांच्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव सादर केला होता.या योजनेची अंदाजपत्रकीय किंमत 190 कोटी 10 लाख रुपये इतकी आहे. याशिवाय ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद सांगली यांच्यामार्फत जत तालुक्यातील 23 गावांची स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजनेचे प्रस्ताव सादर केले होते. त्याची अंदाजपत्रकीय किंमत 32 कोटी 54 लाख रुपये इतकी आहे. या दोन्ही योजनेची एकूण किंमत 222 कोटी 54 लाख रुपये इतकी आहे. सदर कामाचा आराखडा मंजूर आहे. प्रत्यक्ष कामाचे सर्वेक्षण करून अंदाज पत्रक तयार करण्यात येणार आहे.तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर निधीच्या उपलब्धतेनुसार निविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात येणार आहे असेही आ.जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.