|

जत,(का.प्रतिनिधी):जत तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन अनेक महिने संपले.पंरतू अनेक सत्ता घेताना आश्वासने दिलल्या पदाधिकाऱ्यांची गावे प्राथमिक विकासापासून कोसो दूर राहत आहेत. पूर्वीच्या ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळणार्या ग्रा.प.च्या पदाधिकार्यांनी जनसमस्यांना प्राधान्य देऊन गाव विकासासाठी तगमग दाखविली होती. मात्र सध्या कार्यरत असलेले पदाधिकारी जनतेच्या समस्या निस्तारण्याऐवजी स्वत: ठेकेदार बनून जनतेची दिशाभूल करीत स्वार्थ साधण्यात अग्रेसर झाले आहे.त्यांतच सत्तेचे त्रांगडे,संरपच एका पक्षाचे व बहुमत दुसऱ्या पक्षाचे अशाने राजकीय वादाचा विकास कामावर मोठा परिणाम झाला आहे.
निवडणुकीत मतदारांना अनेक भूलथापा देत अर्थकारणातून निवडणूका जिंकल्या. पदावर आरुढ होताच आपला छूपा चेहरा विविध कामातून दाखवून दिला. ग्रामपंचायतीच्या फंडात लाखो रुपयांचा निधी विकासात्मक कामासाठी जमा झाला. मात्र दज्रेदार कामे करून समस्या निकाली काढण्याऐवजी निकृष्ट कामे करून स्वत:चे उखळ पांढरे करण्यातच विद्यमान पदाधिकार्यांनी धन्यता मानल्याचे अनेक गावात दिसून येत आहे. अनेक कामे करताना लाखो रुपयांच्या निधीला चुना लावत स्वत:चे खिसे भरण्याचे काम जनतेच्या नजरेतून सुटले नाही. त्यावर ग्रामसभेत ग्रामस्थांनी विचारणाही होतात. त्या फक्त एका दिवशी चर्चा होते. विरोध करणाऱ्याला मॅनेज केले जाते. व पुन्हा जून्या वर पांघरून टाकून नव्याने कामे केली जात आहेत. अनेक गावात सिमेंटचे रस्ते लाखो रुपये खर्चून बांधण्यात आले. त्यासाठी पं.स. निधी,वित्त आयोग निधी यासह विविध निधी खर्च करण्यात आला. सध्या त्या सर्व कामाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्यांचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याचे दिसते. त्या रस्त्यावरुन वाहन सोडा पायदळ चालणार्यांना जीव धोक्यात घालून तारेवरची कसरत करावी लागते.
अनेक ग्रामपंचायतीवर नवनियुक्त पदाधिकार्यांनी सभा हस्तगत करून अनेक कामाचा सपाटा सुरू केला. ग्रामपंचायतीच्या नावावर आलेल्या कामाचे पदाधिकार्यांनी स्वत: ठेकेदार बनून कामे केली. कामे करताना फक्त किती पैसे शिल्लक राहतील अशी कामे झाल्याने कामात दर्जाच राहिला नसल़्याची नागरिकातून ओरड आहे.झालेल्या संपूर्ण कामाची अंदाजपत्रकाप्रमाणे वरिष्ठ स्तरावरुन चौकशी करून संबंधितावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. मात्र जनतेच्या मागणीला धूडकावीत पदाधिकारी व अधिकारी झोपेचे सोंग घेवून गावकर्यांची दिशाभूल करीत आहेत. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये अनेक नियमबाह्य कामे करण्यात आली असून गाव विकासाच्या निधीची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली आहे. त्याबाबत गावकर्यांत प्रचंड रोष असून झालेल्या कामाची खर्च झालेल्या निधीची चौकशी करण्याची मागणी गावकर्यांकडून होत आहे. आता अधिकार्यांची काय भूमिका असेल, यावर अनेकगावात चर्चा असून पदाधिकारी अधिकार्यांना कसे मॅनेज करतात, याकडे जनतेचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
|