जत,(प्रतिनिधी):सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करावा, या व अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी आज संपावर गेल्याने पंचायत समिती,तहसिल कार्यालयसह विविध शासकीय विभाग,शाळा येथील कामकाज ठप्प होते. या संपाला प्रथमच अभूतपूर्व असा प्रतिसाद कर्माचार्यांनी दिला. तालुक्यातील प्राथमिक,माध्यमिक शाळादेखील बंद होत्या. आणखी दोन दिवस अशीच परिस्थिती राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
तालुक्यातील बुधवारी पंचायत समिती, तहसील कार्यालय या परिसरात शुकशुकाट होता. कर्मचारी जाग्यावर नसल्याने कामासाठी आलेल्या लोकांनी लागलीच परतीचा मार्ग धरला. त्यामुळे दिवसभर सर्व शासकीय कामे ठप्प होती. या संपात शिक्षण विभागातील अधिकारी,केंद्रप्रमुख आणि शिक्षकही जवळपास शंभर टक्के सहभागी झाल आहेत. त्यामुळे कोणतेच कामकाज होऊ शकले नाही. तालुक्यातील 28 केंद्रातल्या बहुतांश शाळा बंद होत्या. दरम्यान, शिक्षक संघटनांनी शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असल्याचे सांगितले.सकाळी दहा वाजता पंचायत समितीचे अधिकारी,कर्मचारी आणि विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आदींनी पंचायत समितीच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली.शिक्षकांनी पहिल्या दिवसाचा संप यशस्वी केला असल्याचे संघटनेचे पदाधिकारी रामराव सावंत,देवाप्पा करांडे, श्री.जेऊर,रमेश साबळे, लहू वाघमोडे,राजाराम सावंत, अरुण नागणे, दिगंबर सावंत,संतोष काटे,लखन होनमोरे यांनी सांगितले.
जत पंचायत समितीच्या कार्यालयासमोर पंचायत समिती कर्मचारी संघटना व शिक्षक संघटनांनी निदर्शने केली.





