जत | अर्ध्या पावसाळ्यातच रस्ते खड्डेमय! |

0
2

जत,प्रतिनिधी:शहरासह तालुक्यातील रस्त्यांची सध्या अर्ध्या पावसातच चाळण झाली आहे. सप्टेंबरअखेरीस पावसाळा संपताच नव्या रस्त्यांच्या निविदा निघतील. कारभार्‍यांची लगबग सुरू होईल. ढपल्याच्या चर्चा रंगतील. चिरीमिरीच्या वाटपाने अधिकारीही सुखावतील आणि जनतेच्या कराच्या पैशातून रस्त्यांना पुन्हा एकदा डांबराने सारवलेही जाईल. तथापि वर्षा-सहा महिन्यात निकामी होणार्‍या या रस्त्यांची जबाबदारी कोणाची हा प्रश्‍न मात्र निरुत्तर राहण्याची शक्यता आहे. या रस्त्यांच्या दुरवस्थेची एक स्वतंत्र व्यवस्थेमार्फत चौकशी होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
जत तालुक्यातील रस्ते कोणासाठी? असा सर्वात मोठा कळीचा मुद्दा आहे.बांधकाम विभाग व पालिकेतील कारभार्‍यांच्या ढपल्यासाठी की कंत्राटदारांच्या भल्यासाठी? असा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. कारण जुने रस्ते खराब झाल्याखेरीज नव्या रस्त्यांची कामे निघत नाहीत, अशा एका विचित्र अर्थकारणामध्ये शहरासह तालुक्यातील रस्ते अडकले आहेत. या रस्त्यांच्या गुणवत्तेची खरोखरीच एकदा आयआयटीसारख्या उच्च तंत्रशिक्षण संस्थेकडून चौकशी झाली तर याचे बिंग फुटू शकेल. रस्त्यांच्या या दुरवस्थेला केवळ कंत्राटदार जबाबदार आहेत अशातील भाग नाही.

त्यांच्यावरील आर्थिक दबाव त्यांना काम करू देत नाही हे सत्यही आता उलगडण्याची वेळ येऊन ठेपली आहे. तेच तेच कंत्राटदार कामे घेत असल्याने अशी स्थिती उद्धभवत आहे. दुसरे प्रशासनामध्ये नियोजन नाही आणि नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची इच्छाही नाही हे आणखी एक कारण आहे. जगामध्ये प्लास्टिक वेस्ट मिश्रित रस्त्यांचे नवे तंत्रज्ञान विकसित झाले. दहा-दहा वर्षे या रस्त्यांना काही होत नाही हे सिद्धही झाले आहे. तरीही आम्ही जुन्या पद्धती सोडत नाही कारण रस्ते खराब झाले नाहीत तर ढपला पाडता येत नाही हे यामागचे खरे गमक असल्याने नागरिकांनाच आता रस्त्यांच्या गुणवत्तेचे आंदोलन हाती घ्यावे लागणार आहे. 

खराब रस्त्यांमुळे अपघात 

शहरासह तालुक्यातील एकाही रस्त्याला लेव्हल (पातळी) नाही हे सर्वात मोठे दुखणे आहे. याशिवाय रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य ड्रेनेज व्यवस्था नाही हे आणखी एक महत्त्वाचे कारण रस्त्यांच्या दुरवस्थेमागे आहे. आणखी यामध्ये भरीत भर म्हणजे रस्त्यांच्या कामावर जे सुपरव्हीजन हवे त्याचा सर्वात मोठा अभाव हवे. अभियंत्यांना वेळ आणि स्वारस्य नसल्याने तालुक्यातील रस्ते हे मुकादमांच्या सुपरव्हीजनखाली तयार होतात आणि अशा रस्त्यांवर नागरिकांना सर्कस करावी लागते. यामध्ये काही निष्पापांचे बळी जातात, काहींना कायमचे अपंगत्व येते.  केवळ खराब रस्त्यांमुळे कोल्हापूरकरांवर प्रतिवर्षी एकत्रित कोट्यवधी रुपयांचा दवाखान्याचा खर्च लादला जाऊ लागला आहे. याकडे आम्ही गांभीर्याने पाहणार आहोत की नाहीत हाच खरा प्रश्‍न आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here