जत,प्रतिनिधी:देशात सर्वत्र भाजपचीच सत्ता असताना जतच्या आमदारांना उपोषण करावे लागत आहे, हे हस्यास्पद आहे. जत तालुक्यात नेमके कुणाचे अवैध धंदे आहेत व कोण गुंडगिरी करत आहे, याचे आमदार जगताप यांनी आत्मपरिक्षण करावे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे यांनी पत्रकार बैठकीत केली.
शिंदे म्हणाले, जतचे आमदार विलासराव जगताप यांनी सलग दुसऱ्या वर्षी पोलीसांविरूध्द उपोषण करित आहेत. त्यांचे सरकार व त्यांचेच गृहमंत्री असताना त्यांच्यावर उपोषण करण्याची वेळ का आली ? याचा त्यांनी आमदार म्हणून खुलासा करावा. अन्यथा राजीनामा देऊन घरी बसावे.
आमदार यांनी त्रास देऊन अनेक अधिकाऱ्यांना पळवून लावले आहे. त्याामुळे जत तालुक्यात येण्यासाठी अधिकारी इच्छुक नाहीत. तालुक्यात अधिकाऱ्यांची सोळा पदे रिक्त आहेत.
आमदारांच्या बगलबच्च्यांचे तालुक्यात अवैध धंदे आहेत. त्यांनी आधी आपल्या कार्यकर्त्यांना आवरावे म्हणजे अवैध धंदे बंद होतील. त्यासाठी उपोषणाचा स्टंट करण्याची गरज नाही,अशी टीका शिंदे यांनी केली.




