जत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील डफळापूर येथे आंदोलकांनी रावसाहेब दानवे, सुभाष देशमुख यांची गाडी अडवून आरक्षण द्या अन्यथा मराठा समाज भाजपच्या मागे राहणार नाही अशी अशी घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाची मागणी केली.
जत तालुक्यातील जत व डफळापूर येथे मराठा समाजातील कार्यकर्त्याने घेतलेल्या जलसमाधीनंतर राज्यभरात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका उडाला. त्याचे तीव्र पडसाद मंगळवारी जत शहरासह तालुक्यातही उमटले. निषेध सभा, निदर्शने यामुळे संपूर्ण तालुका ढवळून निघाला. नागरीकांनी दैनंदिन सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेऊन काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली वाहिली आणि सरकार विरुध्दचा आपला रोष देखिल व्यक्त केला. शहरात बंद शांततेत पार पडला.
नागरीकांनी दैनंदिन सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेऊन काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली वाहिली
सोमवारी औरंगाबाद येथे घडलेली घटना आणि पाठोपाठ राज्यातून उमटत असलेल्या प्रतिक्रियांचे लोण डफळापूरही उमटले.डफळापूरातील स्व व्यवहार बंद ठेऊन काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.त्याशिवाय सांगलीकडे निघालेले भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,पालकमंत्री सुभाष देशमुख, खा.संजय पाटील यांची गाडी अंदोलकांकडून अडविण्यात आली.
मंगळवारी सकाळपासून बंदला उत्स्फुर्तपणे सुरुवात झाली.आता आरक्षण द्या अन्यथा यापुढो मराठा समाज गृहीत धरू नका,आरक्षण देणे सरकारचे काम आहे.त्या वेळ व टाळाटाळ करू नका असे यावेळी मराठा स्वराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाषराव गायकवाड यांनी मंत्रीमहोदयांना ठासून सांगितले.कोणत्याही स्थितीत माघार नाही.मराठा समाजाचा अंत पाहण्याचे धाडस सरकारला महागात पडेल असेही यावेळी उपस्थित अंदोलकांनी सांगितले.यावर सरकार अारक्षण देण्यासाठी प्रयत्न आहे.मराठा आरक्षण देणारचं आहोत असे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान जत शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा, प्रमुख रस्त्यावरील दुकानदार, व्यावसायिक आपल्या दारात थांबून होते, परंतु त्यांचे दुकाने उघडण्याचे धाडस झाले नाही. काही ठिकाणी अर्धवट शटर्स उघडे ठेऊन व्यवहार सुरु ठेवले खरे पण नंतर रॅली निघाली तसे कडकडीट बंद पाळावा लागला. रिक्षा वाहतुक पूर्णपणे बंद झाली. मात्र एसटी,खाजगी सेवा सुरळीत सुरु होती. पण प्रवासी नसल्याने दुपारनंतर बस फेऱ्या आपोआपच कमी झाल्या.
डफळापूर : येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,पालकमंत्री सुभाष देशमुख यांची गाडी अडविणून मराठा संघटनांनी आरक्षण देण्याची मागणी केली.जत येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.






