जत, प्रतिनिधी:समाजातील तळागाळातील घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचाव्यात यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना सुरू केल्या आहेत. कोट्यावधी कुटुंबांना त्याचा लाभ होत अाहे. पाच लाखापर्यंतचा उपचार मोफत होऊ शकतात, असे प्रतिपादन खासदार संजय पाटील यांनी केले.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या हभप नारायणराव सुबराव जगताप यांच्या स्मृतिप्रत्यर्थ जिल्हास्तरिय आरोग्य महाशिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आमदार विलासराव जगताप, जि.प.अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आरोग्य व शिक्षण सभापती तम्मनगाैडा रविपाटील,समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, डॉ.रविंद्र अरळी, जि प. सदस्य सरदार पाटिल, सभापती मंगल जमदाडे,उपसभापती शिवाजी शिंदे,स्नेहलता जाधव, मंगल नामद, प्रकाश जमदाडे, शिवाजी ताड, प्रभाकर जाव,आप्पासाहेब नामद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ डी. जी. पवार आदी उपस्थित होते.
खासदार पाटील म्हणाले, जत तालुक्यातील रस्ते, पाणी याचबरोबर आरोग्याचाही मोठा प्रश्न आहे. भाजप सरकारने त्यासाठी खास उपाययोजना केल्या आहेत. म्हैसाळ योजनेचे काम दहा महिन्यात पूर्ण होईल.70 गावच्या पाणी योजनेस लवकरच मंजूरी मिळेल.
आमदार जगताप म्हणाले, जिल्हा परिषदेने माझ्या वडिलांच्या नावाने आरोग्य महाशिबीर आयोजित केले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. जनसेवेचे हे एक चांगले साधन आहे. शिबिरात शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णांचा सहा महिने आढावा घ्यावा. डॉ.रविंद्र अारळी यांनी सुचविल्याप्रमाणे जिपच्या माध्यमातून तालुक्यासाठी दोन डायलिसिस मशिन द्यावेत, अशी मागणी केली. जि.प.अध्यक्ष देशमुख म्हणाले, आरोग्य विमा, ह्रदय शस्त्रक्रिया करण्यात सांगली जिल्हा आघाडीवर आहे. जिल्हा नियोजन मधून जिल्ह्यासाठी 6 डायलिसिस मशिन व 60 ईसीजी मशीन घेण्यात येणार आहेत.
सभापती रविपाटील म्हणाले,आरोग्य विभागाने महाशिबीराचा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक रूग्णांवर खात्रीने ईलाज केला जाईल.
शिबीरात मोफत ईसीजी, रक्त, लघवी तपासणी, डोळ्यांचे नंबर तपासणी, स्त्री पुरूष कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया, म.फुले व जीवनदायी आरोग्य योजनेतील 191 विकारावरील उपचार करण्यात आले.काही जणांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील 19 खासगी रूग्णालये व मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमधील डॉक्टर शिबीरात सहभागी झाले आहेत.सर्व प्रकारच्या व्याधींची तपासणी व उपचाराची सोय करण्यात आली.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या हभप नारायणराव सुबराव जगताप यांच्या स्मृतिप्रत्यर्थ जिल्हास्तरिय आरोग्य महाशिबीरात बोलताना खा.संजय पाटील व मान्यवर





