जत,प्रतिनिधी:जत तालुक्यात वाळू तस्करांनी पुन्हा डोके वर काढले आहे. जत तालुक्यातील बोर,कोरडा नदी,डोण वडा,कुडणूर ओढापात्रातून रात्री चोरुन बेबंद उपसा केला जात आहे.तहसिलदार अभिजित पाटील सध्या बाहेरगावी असल्याने वाळू तस्करीत वाढ झाल्याचे चित्र आहे.काही ठिकाणी वाळू बंद झाल्याने माती उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तालुका प्रशासन याबाबत हातावर हात बांधून बसले आहे. यातून माफिया गब्बर होऊ लागले आहेत.
वर्षभरापूर्वी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर वाळूमाफियांचे कबंरडे मोडले. धाडसी कारवाई करुन त्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी शेकडो ब्रास वाळू जप्त केली. कित्येक वाहने ताब्यात घेतली. लाखो रुपयांचा दंड केला. जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई होती. यामुळे वाळू चोरट्यांना कळायचे बंद झाले होते. अनेकांची पुरती घाबरगुंडी उडाली होती. कारवाईच्या भीतीने अनेकांनी तस्करी बंद केली. यामुळे जिल्ह्यातील वाळूचा दोन नंबरचा धंदा जवळपास पूर्णपणे थांबला. सहा-सात महिने कोणीही काहीही हालचाल केली नाही.पण मागील दोन-चार महिन्यांपासून तस्करांनी पुन्हा हळूहळू डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत रात्री वाळूची चोरटी वाहतूक सुरू झाली आहे. यासाठी महसूलची ‘साथ’ घेतली जात आहे.
प्रामुख्याने जत तालुक्यात वाळू चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातील बोर नदीपात्र खरडून काढण्याचे काम रात्रभर केले जात आहे.कुडणूर, डोण ओढा,कोरडा नदीपात्रासह अचकनहळ्ळी, उमदी, मुचंडी, बालगाव, संख, सुसलाद, सोनलगी, हळ्ळी, बेळूडंगी, तिकोंडी यासह अन्य गावांत वाळू चोरी सुरू आहे. तसेच कर्नाटकातील विजापूर, अथणी, चडचण व सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, सांगोला येथून उपसा केलेली वाळू सहजपणे जतमध्ये आणली जात आहे. याकडे महसूलचे साफ दुर्लक्ष आहे. दाखविण्यासाठी लुटूपुटूच्या कारवाया केल्या जात आहेत. पोलिस व महसूलमधील कर्मचार्यांचे हात यात गुंतले आहेत.कारवाय थंडावल्याने वाळू माफियांनी पुन्हा धुमाकूळ घातला आहे.
वाळू चोरीचे आगार असलेल्या काही गावात सध्या तस्करी पूर्णपणे ठप्प आहेत. पण वाळू बंद म्हणून माफिया मातीकडे वळले आहेत. डंपर, जेसीबीची यंत्रणा नदीकाठची माती खोदाईसाठी वापरली जात आहे. काही ठिकाणी मुरुम, दगडे याची चोरीही केली जात आहे.
वाळूचा दर ट्रकला
चोरी बंद झाल्याने वाळू दर गगनाला भिडले आहेत. सहा महिन्यापूर्वी वाळूचा पाच ते सहा ब्रासचा डंपर 40 ते 50 हजार रुपयांना मिळत होता. आता यात आणखी वाढ झाली आहे. 60 हजारांपासून ते 80 हजार असा सरासरी दर वाढला आहे.एका टॅक्टरचा दर 2 हाजारावरून 4 हाजारावर आला आहे. यामुळे वाळू माफियांचे उखळ पांढरे झाले आहे. अनेकजण लखपती झाले आहेत.
तहसिलदार बाहेरगावी असल्याने चोराचे फावले
तहसिलदार अभिजित पाटील यांनी वाळू तस्करांच्या पार मुसक्या आवळल्या होत्या, पण ते सध्या बाहेरगावी गेले आहेत. यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावले आहे. हळूहळू सुरू असलेला उपसा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात सुरू आहे. यावर सध्याच्या अधिकार्यांनी कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे.





