लहानपण देगा देवा,,, लहानपण – बालपण म्हणजे मौज धमाल आणि हसत खेळत शिक्षण ह्याचा अनुभव प्रत्येकानी घेतलेला असतो, बालपणी मुलांच्यात दंगा करण्याची खूप ऊर्जा असते त्या उर्जेला चांगली दिशा दाखवली तर त्याला आपले ध्येय नक्कीच गाठता येऊ शकते. हे संस्कार लहानपणीच आपल्यावर आई – बाबा – शिक्षक आणि आपली नातेवाईक मंडळी करीत असतात, लहानपणी खूप दंगा केला तर त्याची शिक्षा हि मिळतेच त्यातून मुलांनी आपल्या स्वभावात सुधारणा करायची असते, पण लहान मुले दंगा–मस्ती प्रमाणाबाहेर का करतात त्याची एक मानसिकता जाणून घ्यायला पाहिजे,,, अश्याच लहान मुलांचा विषय घेऊन चित्रपट निर्माते विवेक डी, रश्मी करंबेळकर, मंदार टिल्लू, विजू माने यांनी मंकी बात ची निर्मिती केली आहे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आकाश पेंढारकर, विनोद सातव, अभय ठाकूर, प्रसाद चव्हाण शंकर कोंडे हे असून हि प्रो ऍक्टिव्ह ची प्रस्तुती असून निष्ठा प्रोडक्शन ची निर्मिती आहे. कथा लेखन विजू माने, पटकथा विजू माने, महेंद्र कदम, संवाद आणि गीते संदीप खरे, छायाचित्रण क्रिष्णा सोरेन, संकलन सतीश पाटील, संगीत डॉ सलील कुलकर्णी, यांचे लाभले असून ह्या मध्ये वेदांत आपटे, पुष्कर क्षोत्री, भार्गवी चिरमुले, अवधूत गुप्ते, नितीन बोर्डे, मंगेश देसाई नयन जाधव, विजय कदम, राधा सागर, समीर खांडेकर ह्या कलाकारांनी आपापल्या भूमिकेला न्याय दिलेला आहे.
वायू नावाच्या शाळेत जाणाऱ्या लहान मुलाची कथा ह्या सिनेमात मांडली आहे. वायू आणि त्याचे बाबा श्रीकांत आणि आई अंजली हे सारे कोल्हापूर ला राहत असतात, वायू शाळेमध्ये हुशार मुलगा म्हणून सर्वाना माहित असतो वायू उत्तम फुटबॉल खेळतो आणि त्याने शाळेला फुटबॉल ची ट्रॉफी जिंकून दिलेली असते, ती ट्रॉफी घेऊन तो घरी आई–बाबांना दाखवतो त्यावेळी त्याचे बाबा त्याला सांगतात कि आपण आता मुंबईला जाणार आहोत कारण माझी बदली मुंबई ला झालेली आहे, वायू ला खूप दुःख होतं कारण त्याच्या मित्र परिवाराला सोडून तो मुंबईला जाणार असतो.
मुंबई मध्ये ते एका मोठया सोसायटी मध्ये राहायला जातात, सोसायटी खूप मोठी असल्याने तेथे खेळायला जागा खूप असते पण सोसायटी मधील मुले वायू ला खेळायला घेत नाहीत, ते त्याची टिंगल टवाळी करतात, मुले आणि वायू या दोघांच्या मध्ये श्रीकांत अर्थात वायू चे बाबा मध्यस्थी करतात आणि वायू त्यांच्यात खेळायला सुरवात करतो त्यावेळी मुलांच्या हातून एका खिडकीची काच फुटते आणि नाव मात्र वायू चे घेतले जाते, सगळ्यांचा राग वायू ला सहन करावा लागतो, त्याचवेळी वायू ठरवतो कि आता आपण चांगलं वागून काही उपयोग नाही आपल्याला आता त्या मुलांना दंगा–मस्ती करून धडा शिकवायला पाहिजे, आणि वायू दंगामस्ती करून सोसायटी मधील मुलांना त्रास द्यायला सुरवात करतो. शाळेतील मुलांना तो छळतो, त्याच्या आई कडे तक्रार केली जाते, तरी वायू ची दंगा–मस्ती थांबत नाही,
एक दिवस तो असाच त्रास देत असताना कृष्णा नावाचा माणूस विविध रूपाने येऊन वायू ला दंगा करू नकोस असे समजावतो, पण वायू त्याचे काही ऐकत नाही, शेवटी कृष्णा वायू ला सांगतो कि आता तुझे शंभर अपराध पुनः झाले कि तुझे रूप माकडात होईल ह्यावर वायू विश्वास ठेवत नाही आणि तो एक अपराध करतो आणि वायू चे रूप माकडा मध्ये होऊन जाते.
वायू चे रूपांतर माकडात होते त्यावेळी त्याला आपली चूक करून येते, वायू ने केलेल्या दंगामस्ती ची शिक्षा त्याला मिळते, सोसायटी मध्ये माकड आले म्हणून सोसायटीमध्ये गोंधळ उडून जातो, त्या नंतर सोसायटी मधील लोक माकड पकडणाऱ्या व्यक्तीला घेऊन येतात, आणि मग पुढे नक्की काय होते ते तुम्ही सिनेमा पाहून ठरवा, वायू ला त्याच्या शिक्षेचे काय वाटते ? त्याला पुन्हा कृष्णा भेटतो का ? वायू मध्ये बदल होतो कि नाही ? वायू ला आणखी कोणते दिव्य करावे लागते ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तररे ह्या सिनेमात सापडतील त्यासाठी तुम्ही सिनेमा पाहावा, यामधील वायू ची भूमिका वेदांत आपटे यांनी केलेली असून त्याने भूमिकेमधील अनेक बारकावे उत्तमपणे सादर केले आहेत. श्रीकांत अर्थात वायू चे बाबा ची भूमिका पुष्कर क्षोत्री यांनी आणि अंजली [ वायू ची आई ] ची भूमिका भार्गवी चिरमुले हिने छान रंगवली आहे. कृष्णांच्या भूमिकेत अवधूत गुप्ते छान दिसले असून त्यांनी भूमिका मस्तपैकी खुलवली आहे… ह्या शिवाय विजय कदम, मंगेश देसाई, नयन जाधव, समीर खांडेकर, नितीन बोर्डे, राधा सागर यांनी आपल्या भूमिका चोखपणे सादर केल्या अहित. चित्रपटाचे संगीत हि एक बाजू ठीक आहे,
एकंदरीत एक दंगलमस्त – गमतीदार घटनांनी भरलेला हा सिनेमा आहे. हसत खेळत हा सिनेमा लहानमुलांना एक छान संदेश देऊन जातो. संदेश काय तो सिनेमात कळेल. बालगोपाल मंडळी ना सिनेमा पसंत पडायला हरकत नसावी,,,,
दीनानाथ घारपुरे [ मनोरंजन प्रतिनिधी ] ९९३०११२९९७