जत,(प्रतिनिधी): जत येथील विज वितरण कार्यालयातील उपअभियंता संजय काळबांधे अनेकवेळा कार्यालयात उपस्थित नसतात.शेतकरी नागरिक त्यांच्याकडे कामानिमित्त गेल्यानंतर त्याच्यांकडून समाधानकारक उत्तर देत नाहीत. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी विज वितरण कार्यालयातील कामकाजाची तपासणी करून दोषींवर कारवाई करावी,असा ठराव जत पंचायत समिती मासिक बैठकीत एकमताने समंत करण्यात आला.पं.स. अध्यक्षस्थानी सभापती मंगल जमदाडे होत्या.
संजय काळबांधे यांचे कर्मचाऱ्यावर नियंत्रण राहिले नाही.अनेक उप कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्याचे फोन उचलत नाहीत. खराब टि. सी.वेळेत बदलून मिळत नाही . टि.सी.बदलण्यासाठी पैशाची मागणी केली जात आहे.पाण्याअभावी पिके वाळून जात आहेत. शेगांव व कुंभारी कार्यालयातील कर्मचारी मनमानी करत आहेत. त्यांची तेथून अन्यत्र बदली करावी अशी मागणी रवींद्र सावंत व अर्चना पाटील यांनी सभागृहात केली.
तालुक्यात 2 हजार 308 हातपंप व विजपंप आहेत. त्यापैकी 348 हातपंप व 4 विजपंप नादुरुस्त आहेत. त्यामुळे पाणी असूनही ऐनवेळेस उन्हाळ्यात नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे. हातपंप दुरुस्त करण्यासाठी दोन गाड्या आहेत त्यापैकी एक गाडी नादुरुस्त असून एक गाडी पं. स. कार्यालय परिसरात थांबून असते.गाडीचा चालक चहाच्या टपरीवर दिवसभर बसून शासकीय पगार घेत आहेत.अशा प्रकाराने शासनाचे वर्षाला लाखो रुपये वाया जात आहे. कोणतेही काम केले जात नाही. मी विद्यमान पदाधिकारी असूनही मला यासंदर्भात नाईलाजाने सभागृहात तक्रार करावी लागत आहे. अशी खंत उपसभापती शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केली.सभागृहात फक्त चर्चा होते,अधिकारी त्यावर कारवाई करत नाहीत. मागील वर्षभर असाच प्रकार सुरू आहे. मासिक बैठकीला येवून प्रश्न सुटत नाहीत त्यामुळे आणखी प्रश्न निर्माण होत आहेत. अशी तक्रार अश्विनी चव्हाण यानी केली.
रस्ते दुरुस्ती,दळणवळण,बांधकाम,पाणी टंचाई, आरोग्य,शेती,प्राथमिक शिक्षण,अंगणवाडी, ग्रामपंचायत व विविध शासकीय योजना यासंदर्भात सभगृहात चर्चा झाली.यावेळी मनोज जगताप,श्रीदेवी जाविर,विष्णू चव्हाण यांनी चर्चेत भाग घेतला.लक्ष्मी माळी ,सुनंदा तावशी,रामाण्णा जिवन्नवार,अॅड. आडव्याप्पा घेरडे आदी यावेळी उपस्थित होते.