दुरूस्तीकडे पालिकेचे दुर्लक्ष
जत,प्रतिनिधी : येथील हिंदू स्मशानभूमीतील शवदाहीनीची दुरावस्था झाली आहे.त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नादुरुस्त शवदाहीनीची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश गिड्डे यानी जत नगर पालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे. मात्र अद्याप त्यावर कारवाई न झाल्याने जैसेथे स्थिती कायम आहे.
स्मशानभुमीतील मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना शवदाहीनी व्यवस्थित असेलतर मृतदेहाची विटंबना होत नाही. सध्या येथे अस्तित्वात असलेली शवदाहीनी नादुरुस्त आहे. मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना व्यवस्थित करता येत नाहीत. अर्धवट जळलेल्या आवस्थेत मृतदेह लाकडातून बाहेर पडण्याचा धोका असल्यामुळे संपूर्ण मृतदेह जळेपर्यत नातेवाईकांना रात्री अपरात्री स्मशानभूमीत ताटकळत बसावे लागत आहे. माणसाच्या मृत्यूनंतर मृतदेहाची हेळसांड व विटंबना होवू नये म्हणून नगर पालिका प्रशासनाने शवदाहीनिची त्वरित दुरुस्ती करावी अन्यथा नागरिक आंदोलन करतील असा इशारा गणेश गिड्डे यानी या निवेदनात दिला आहे.