Untitled Post

0
4

वास्तव सत्य 

—————–

राजू माळी

तालीम गावात तालीम होती. सोबतीला लाल माती होती. भल्या पहाटे गोठ्यातल्या गाई म्हशीच्या फेस आलेल्या दुधाच्या चरव्या रिकाम्या करणारी तरुण पोरं होती. गावातलं दूध गावच्या पोराबाळांसाठी राखून ठेवलं जायचं. अशी गावाची रीत होती. झुंजूमुंजू झालं की तालमीला जाग यायची. दिवळीतल्या कंदिलाची वात चढायची. दंड थोपटले जायचे. जोर बैठका निघायच्या. हौद्यातली माती पेटून उठायची. गावचे तारुण्य लाल मातीत घुसळून निघायचं. मातीत शरीरे झाकली जायची. यात्रा जत्रा व्हायच्या. कुस्त्यांचे आखाड़े फुलायचे. वस्ताद आखाडयातून फिरायचे. कुस्ती रंगात यायची. लाऊडस्पीकर घुमू लागायचा. “अमक्या वस्तादाचा पट्ठा हाय बघ… !” कुस्ती जिंकल्यावर आरोळी उठायची……काळ कात टाकतो.कुस्ती शरण येते. तालीम आजही असते. तिला मोडका दरवाजाही असतो. दिवसभर आता तो गावाकडे विषन्न नजरेने पहात राहतो. तालमीच्या हौद्यात घटलेली मातीही असते. मातीत आता उंदीर कुस्त्या खेळतात. पावसाळयात तालीम फुटक्या कौलांतून अश्रू ढाळत राहते. तालीम आज सूनी सूनी असते. तर गावातले तारुण्य बार मध्ये कलंडत राहते. तालमीत बाटल्यांचा खच दिसतो. दिवळीतल्या हनुमानचा फोटो हौदयातल्या मातीकडे हताश पणे पहात राहतो. मातीतल्या कोपऱ्यात व्यालेली तांबडी कुत्री तिच्या सात पिलांना पैलवान करण्याची स्वप्ने पहात दूध पाजत पडून राहते.तर सकाळी एखादा जीर्ण देहाचा म्हातारा झालेला” वस्ताद ” तालमीचे भग्न अवशेष शोधत बाटल्यांच्या काचा थरथरत्या हाताने गोळा करत राहतो…हेच वास्तव जत तालूक्यातील अनेक गावात डोळ्याआड न करणार आहे. काही बोटावर मोजण्याऐवढी गावे वगळता तालिम फक्त तालिम म्हणण्यापुर्ती बाकी राहिली आहे.सत्याचा बाजार संपला खोट्याच्या लंपडावात सर्व प्रकारचे विरत्व हरवयं,या बदलण्यासाठी पुन्हा सत्याचा मार्ग अवलबंवा लागणार आहे.. खरचं हे शिवधनुष्य उचलण़्याचे कोण करणार का….

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here