वर्षात खड्ड्यात गेलेल्या रस्ते दुरूस्थीसाठी हालचाली
भ्रष्ट साखळीने सर्वच नवे रस्ते खड्डेमय ; दुरूस्थीनंतरतरी दर्जा टिकणार का?
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील गेल्या वर्षभरात झालेल़्या सर्व रस्त्यावर खड्ड्याची मालिका तयार झाली आहे. रस्त्याची स्थिती बघितलीतर खरचं डांबरीकरण केले आहे काय?असा प्रश्न उपस्थित होत आहे. रस्ते काम करताना मिलिभगतचा हा नमुना आहे. सर्वाना उत्पन्नाचे सोर्स असल्याने सर्वकाही ठिकठाक आहे. डांबर म्हणून काळे आईलही ओतण्याचे प्रकार झाल्याचे कळते. आता जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी रस्ते खड्डेमुक्त करण्याचे सक्त आदेश अधिकारी आणि ठेकेदार यांना दिले आहेत. खड्ड्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. त्यामुळे जत तालुक्यातील काही रस्त्यावर खड्डे माजविण्याच्या साहित्याची जमवाजमव सुरू आहे. प्रत्यक्षात काम सुरू नाही. वर्षभरात रस्ते कामाचे सत्य बाहेर आले आहे. आताही तोच पाठा वाचला जाऊ नये यासाठी रस्ते कामातील टक्केवारी, भेसळयुक्त डांबराचे रॅकेट यावरही घाव पडायला पाहिजे. अन्यथा ‘रस्ते खड्डेमुक्त’चा आदेश तात्पुरती मलमपट्टी ठरेल. रस्त्यांवरील खड्डे प्रकरणात जिल्हाअधिकाऱ्यांनी लक्ष घातल्याने प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. रस्ते आणि खड्ड्यांवर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा चुराडा होतो. मात्र, रस्त्यांवरून सुरक्षित, समाधानाचा प्रवास लोकांच्या नशिबी दिसत नाही. खड्ड्यांमुळे रस्त्यांवरून जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. खड्ड्यांमुळे अनेक बळी गेले आहेत. मात्र त्याबद्दल यंत्रणेला ‘ना खेद ना खंत’, अशी स्थिती आहे. रस्ते कामात टक्केवारी बोकाळली आहे. ठेकेदारांची नफेखोरीही वाढली आहे. त्याचा थेट परिणाम कामाच्या दर्जावर झाला आहे. रस्ते कामासाठी वापरले जाणारे डांबर, खडी, मुरूम आणि रोलिंग हा सारा विषयच वादग्रस्त आहे. कंपनीतून डांबर बाहेर पडल्यानंतर लगेचच त्यात भेसळ करणारे रॅकेट कार्यरत आहे. एक टन डांबराचा बाजारभाव 35 हजार रुपयांपर्यंत आहे. डांबरात भेसळ करून पैशाची बचत केली. एवढेच नव्हे तर गरजेच्या 30 ते 40 टक्केच डांबराचा वापर केला जातो. रस्ते डांबरीकरणात डांबर हा सर्वात महत्वाचा घटक आहे. पण भेसळ आणि डांबराचा कमी वापर यामुळे रस्त्याचा दर्जा घसरला आहे. रस्त्यावर लगेचच पडणारे खड्डे हा त्याचाच परिणाम आहे.





