रोहित शर्मा हाच विराट कोहलीचा वारसदार
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा टी २० संघाचे कर्णधारपद सोडणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमात रंगली होती ती अखेर खरी ठरली. विराट कोहलीने टी २० विश्वचषक स्पर्धेनंतर कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. भारतीय क्रिकेट विश्वात सध्या त्याच्या राजीनाम्याचीच चर्चा आहे. विराट कोहलीने राजीनामा का दिला ? विराट कोहलीने राजीनामा दिला की त्याला तो द्यायला लावला? विराट कोहलीचा वारसदार कोण? विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात बेबनाव? अशा अनेक बातम्या आणि चर्चांना उधाण आले. वास्तविक अशा चर्चा करण्यापेक्षा विराट कोहलीच्या राजीनाम्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे.
कसोटी, एकदिवसीय आणि टी २० अशा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात विराट भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. त्याचा ताण त्याच्या फलंदाजीवर देखील पडत आहे. कर्णधारपदाच्या ओझ्यामुळे त्याच्या फलंदाजीवर देखील परिणाम झाला आहे. रन मशीन अशी ख्याती असलेल्या विराटच्या बॅटमधून पूर्वीप्रमाणे धावा बरसत नाहीत. शतकांची रास उभारणाऱ्या विराट कोहलीला मागील दोन वर्षात शतकाची वेस ओलांडता आली नाही. कसोटीत निर्भीडपणे नेतृत्व करणारा विराट आयसीसीच्या स्पर्धात नेतृत्व करताना गांगारून जातो.
चॅम्पियन्स ट्रॉफी, एकदिवसीय सामान्यांचा विश्वचषक, टी २० सामान्यांचा विश्वचषक तसेच कसोटी अजिंक्यपद स्पर्धा या महत्वाच्या स्पर्धांमध्ये विराट कोहली भारतास विजेतेपद मिळवून देऊ शकला नाही हे वास्तव आहे. इतकेच नाही तर आयपीएलमध्येही तो त्याच्या रॉयल चॅलेंज बंगळुरू या संघाला विजेतेपद मिळवून देऊ शकला नाही. आता त्याच्या खांद्यावरील नेतृत्वाचा भार हलका झाल्याने तो फलंदाजीवर लक्ष केंद्रित करेल. त्याचा हरवलेला फॉर्म त्याला पुन्हा गवसेल त्यामुळे त्याच्या बॅटमधून पूर्वीप्रमाणेच धावा बरसायला सुरवात होईल त्याचा फायदा भारतीय संघालाच होईल.
विराट कोहली नंतर भारतीय टी २० संघाचा कर्णधार कोण ? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. भारतीय संघाचा उप कर्णधार रोहित शर्मा हा विराटचा वारसदार असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. बीसीसीआयकडूनही तसे संकेत मिळत आहे. रोहित शर्मा, के एल राहुल, ऋषभ पंत या तीन नावांची प्रसार माध्यमात चर्चा असली तरी रोहित शर्माकडे भारतीय संघाचे कर्णधारपद दिले जाईल असे वाटते कारण रोहित शर्मा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात चांगल्या फॉर्ममध्ये आहे. व्हाईट बॉल क्रिकेटमधील तो जगातील सर्वोत्तम सलामीवर आहे. त्याच्याकडे नेतृत्वगुण आहे. भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.
