एक लाख घेऊन मुरुमाचा डंपर सोडला | तासगाव तहसीलमधील एका अधिकाऱ्याचा प्रताप : तलाठ्याचाही सहभाग

0
तासगाव : तासगाव – कुमठे फाटा रस्त्यावर बेकायदा मुरूम वाहतुकीचा पकडलेला एक डंपर चक्क तोडपाणी करून सोडून दिल्याचा प्रकार रविवारी घडला. तासगाव तहसील कार्यालयातील एक अधिकारी व एका गावचा एक तलाठी या दोघांनी मिळून एक लाखाचा सौदा करून आपले खिसे गरम केल्याची चर्चा आहे. हा डंपर चिंचणी (ता. तासगाव) येथील असल्याचे समजते. या प्रकाराची तासगाव शहरासह चिंचणी येथे जोरदार चर्चा आहे.
      तासगावच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांची बदली झाल्यानंतर येथील पद रिक्त आहे. त्यामुळे कवठेमहांकाळच्या तहसीलदारांकडे तासगावचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. दरम्यान, तासगावचे तहसीलदारपद रिक्त असल्याने तहसील कार्यालयातील काही लाचखोर अधिकाऱ्यांनी गेल्या आठवडाभरापासून धुडगूस घातला आहे. तहसीलदार नसल्याने अनेकांनी तालच सोडला आहे. कारवाईच्या नावाखाली अनेकांनी आपले उखळ पांढरे करण्यास सुरुवात केली आहे. रात्रभर नदीपात्रात उतरून मोठ्या प्रमाणावर सेटलमेंट सुरू आहे.
    तासगाव तहसील कार्यालयातील एका अधिकाऱ्याने गेल्या आठवडाभरापासून आपला खिसा चांगलाच गरम करण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान कुमठे फाट्याजवळील एका पेट्रोल पंपाजवळ याच अधिकाऱ्याने बेकायदा मुरूम वाहतूक करणारा एक डंपर पकडला. या अधिकाऱ्यासोबत एका गावचा तलाठीही होता. त्यानंतर कारवाईसाठी हा डंपर तासगाव तहसील कार्यालयात आणण्यात आला.
     हा डंपर येथील तहसील कार्यालयात आणण्यात आल्यानंतर डंपर चालकाने कारवाई होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू केले. अखेर सबंधित अधिकारी व तलाठ्याबरोबर चक्क एक लाखाचा सौदा ठरला. हे एक लाख रुपये खिशात कोंबल्यानंतर ‘त्या’ अधिकाऱ्याने हा डंपर सोडला.
      या तोडपाणीची आज दिवसभर तासगाव शहरात जोरदार चर्चा सुरू होती. या प्रकाराने तासगाव तहसील कार्यालयातील लाखखोरी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

 

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.