धनगर विवेक जागृतीचे विक्रम ढोणे यांना जीवे मारण्याची धमकी | राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांचे दबाबवतंत्र 

0
जत,संकेत टाइम्स : राज्य मागासवर्ग आयोगातील सदस्यांच्या बेकायदेशीर नियुक्तीबाबत आवाज उठवत असलेले धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांचा भाऊ अशी ओळख सांगणाऱ्या मारूती हाके याच्यावर सांगली जिल्ह्यातील जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य मागासवर्ग आयोगातील सदस्यांचे कागदपत्र पडताळणी,  चारित्र्य पडताळणी व्हावी, तसेच अपात्र सदस्यांना वगळून पात्र सदस्यांना नियुक्त करावे, या मागणीसाठी विक्रम ढोणे यांचा पाठपुरावा सुरू आहे. ढोणे यांनी नुकतीच पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन आयाोगाचे सदस्य लक्ष्मण हाके हे बोगस प्राध्यापक असल्याचा आरोप पुराव्यासह केला आहे.  त्याबरोबरच पुणे येथील राज्य मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयासमोर २ ऑक्टोबरला आंदोलनाचा इशारा दिला आहे.  त्यानंतर लक्ष्मण हाके यांच्या चिथावणीवरून त्यांच्या समर्थकांनी ढोणे यांना धमकावण्याचे प्रकार सुरू केले आहेत.
बुधवार, दि. २९ सप्टेंबर २०२१ रात्री ९.२० ते ९.३५ च्या सुमारास ढोणे हे जत (जि. सांगली) येथील घरी असताना त्यांना लागोपाठ चार फोन आले. त्यातील प्रत्येकजण अरेरावी करून हाके यांच्या बोगसपणाबद्दल बोलू नको, असे सांगत होता.  त्यातील मारूती हाके याने, आपण लक्ष्मण हाके यांचा भाऊ आहे, अशी ओळख सांगितली.  आमचे पद गेले तर चालेल पण तुला संपवून टाकीन… अशी धमकी त्याने दिली. हे सर्व फोन लक्ष्मण हाके यांच्या चिथावणीवरूनच केले जात आहेत. त्यानंतर यासंदर्भातील फिर्याद जत पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
Rate Card
पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार
लक्ष्मण हाके प्राध्यापक नसून ठेकेदार असल्याबाबत पत्रकार परिषद झाल्यापासून लक्ष्मण हाके व समर्थकांचे पित्त खवळले आहे. हाके यांचे सोशल मिडीयाप्रमुख बिरूदेव खांडेकर व विलास गडदे यांनी स्वतःच्या फेसबुक अकौंट, पेजेससह इतर डमी अकौंटवरून माझी बदनामी करण्याचा प्रकार केला आहे. माझ्याविरोधात लोकांना भडकावून,  २ ऑक्टोंबरच्या आंदोलनाला, तसेच माझ्या जीविताला धोका पोहचविण्याचे कारस्थान लक्ष्मण हाके व इतरजण करत असल्याबाबत २८ सप्टेंबर रोजी पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. आता जत पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यासंबंधाने राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडेही तक्रार करणार असल्याचे विक्रम ढोणे यांनी सांगितले.
पुण्यातील आंदोलन होणारच
लक्ष्मण हाके व साथीदार पुण्यातील २ ऑक्टोंबरचे आंदोलन होऊ नये, यासाठीच हे दबावतंत्र अवलंबत आहेत. हाके हे प्राध्यापक असू दे अथवा नसू दे…यावर बोलायचे नाही, यासाठी त्यांचा आटापीटा सूरू आहे. मात्र या प्रकारांना आपण भीक घालणार नाही. पुण्यातील आंदोलन निश्चितपणे होईल. आम्ही आयोगाच्या त्रुटींकडे लक्ष वेधू, असेही ढोणे यांनी सांगितले.
तायवाडेंवरही घेतला होता आक्षेप
आयोगातील ९ सदस्यांपैकी पहिला आक्षेप बबनराव तायवाडे यांच्यावर घेतला होता. ते आयोगावरील समाजशास्त्रज्ञ पदासाठी पात्र नाहीत, असे आम्ही पुराव्यासह सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांत तायवाडे यांनी सदस्यपदाचा राजीनामा देण्याची भुमिका घेतली. तायवाडे व त्यांच्या समर्थकांनी आयोगाचे गांभीर्य पाहता कोणताही उथळपणा केला नाही,  असे ढोणे म्हणाले.
हाके यांनी कागदपत्रे दाखवावीत
आमची मागणी सर्व सदस्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत आहेत. आम्ही लक्ष्मण हाके यांच्या बोगसपणाबद्दल पुराव्यांसह आक्षेप घेतले आहेत. त्यावर त्यांनी स्वतःची कागदपत्रे सादर करावीत, असे आव्हान आहे.  मात्र कायदेशीर पद्धतीचा अवलंब न करता धाकधपटशा दाखवण्याचा प्रकार सुरू आहे, असे ढोणे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.