माडग्याळ : माडग्याळ (ता. जत) येथील
शेळ्या-मेंढ्यांचा बाजार अतिशय प्रसिद्ध आहे.तो आता सुरू झाला आहे. बाजारात स्थानिक माडग्याळ मेंढीला खूप मोठी मागणी आहे.त्यामुळे या दुष्काळी भागातील पशुपालकांत उत्साहाचे वातावरण आहे.माडग्याळ मेंढी ही खास जात विकसित झालेली आहे. उत्तम दर्जाचे, चवदार आणि भरपूर मटण आणि जोडीला दर्जेदार लोकर
यासाठी ही मेंढी प्रसिद्ध आहे.
विशेष म्हणजे या मेंढीला कोरडा चारा चालतो. तोदेखील थोडा लागतो.मेंढीपालन व्यवसाय मांस व लोकर उत्पादनाकरिता केला जातो. कोरडेहवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश यामुळे माडग्याळ मेंढी काटक असते.माडग्याळ तसेच परिसरातील मेंढपाळांनी माडग्याळ मेंढी ही जात विकसित केली आहे.
पांढरट तपकिरी रंग,फुगीर नाक, लांब पाय,विशेष आणि शिंगे नसलेली ही मेंढी काटक आहे. अवर्षण प्रवण क्षेत्र,उष्ण हवामान आणि वारंवार उद्भवणारी चाराटंचाई या परिस्थितीत गाय, म्हैस व अन्य शेळ्यांच्या तुलनेत प्रतिकूल वातावरणात ही मेंढी तग धरते.त्यामुळे माडग्याळ परिसरात या मेंढीचे पालन मोठ्या प्रमाणात करण्यात येते.कोरोनामुळे माडग्याळ येथील जनावरांचा बाजार बंद झाल्यामुळे या मेंढीच्या विक्रीला फटका बसला होता.