जत,संकेत टाइम्स : जत महसूल मधील अनेक प्रताप पुढे येत असून तलाठी,मंडल अधिकारी यांनी संगनमत करून बागेवाडी ता.जत येथील आई-वडीलांची पोटगी मंजूरीनंतर कोणताही आदेश नसताना जमीनीची हिस्सेफोड करून फेरफार मंजूर करत नोंद केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.यांची चौकशी करून संबधितावर कारवाई करावी, या मागणीसाठी नंदा जाधव कुंटुंबियांसह प्रांताधिकारी कार्यालयासमोर शुक्रवार ता.1 ऑक्टोंबर पासून आमरण उपोषणास बसले आहेत.उपोषणात दिलीप जाधव,प्रवीण जाधव,ऋतुजा जाधव सहभागी झाले आहेत.
उपोषणकर्त्या सौ.नंदा दिलीप जाधव यांनी प्रांताधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की,माझी आई रुक्मिणी मारुती चव्हाण यांनी मी व माझी बहिण सौ.वंदना प्रदीप सुळे रा.सावंतपुर,ता पलूस यांच्याविरुद्ध उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे तथा जेष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण यांचे कोर्टात माता पिता व जेष्ठ नागरिक निर्वाह कल्याण अधिनियम २००७ नुसार पोटगी मागणी अर्ज केलेला होता. त्यांचा आदेश ७ सप्टेंबर २०२१ रोजी होऊन दरमहा ५००० रुपये पोटगी मंजूर झालेली आहे.
दि.७ सप्टेंबर २०२१ रोजीच्या आदेशाविरुद्ध मी अप्पर जिल्हाधिकारी, सांगली यांचे कोर्टात प्रथम अपील दाखल केले.दि..७ सप्टेंबर रोजीच्या जमीन वाटपाबाबत अगर जमीन मिळकत हिस्सेफोड करणे बाबत कोणत्याही प्रकारचा आदेश झालेला नसताना दिनांक ७ सप्टेंबर २०२१ च्या आदेशाचा दुरुपयोग करून तलाठी सबन्नावर यांनी फेरफार नंबर २१९७ ची नोंद धरली. तत्कालीन मंडळाधिकारी संदिप मोरे यांनी सदर आदेशाची कोणतीही चौकशी न करता केवळ अर्जदार यांच्याशी संगणमत करून सदरची नोंद चुकीच्या पद्धतीने केलेली आहे.
त्याकामी मी सदर जमिनीत मालकी हक्कात असताना व त्यापैकी श्री शंकर ईश्वर जाधव यांनी क्षेत्र ०.८१ आर खरेदी घेतलेली व त्याची नोंद नसल्याने त्याबाबत अप्पर आयुक्त पुणे विभाग यांचे न्यायालयात वाद सुरू असताना व जत येथील दिवाणी न्यायालयात वाटप दावा सुरू असताना व दिनांक ७ सप्टेंबरच्या उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशविरुद्ध अप्पर जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे अपील दाखल असताना ,कालावधी पूर्ण नसताना सदर आदेशात ७/१२ वरील सामायिकातील क्षेत्र फोडण्याचा आदेश नसताना, चुकीच्या पद्धतीने फेरफार नंबर २१९७ धरून मंजूर केलेला आहे.
त्याबाबत दिनांक 7 सप्टेंबर २०२१च्या आदेशाचा दुरुपयोग करून फेरफार २१९७ धरून चुकीच्या पद्धतीने अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन बेकायदेशीर नोंदवले बाबत तलाठी बागेवाडी व मंडळ अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करून आम्हाला न्याय द्यावा, असे लेखी निवेदनात म्हटले आहे.दरम्यान प्रांताधिकारी यांच्याशी उपोषण कर्त्या जाधव कुंटुंबियांशी चर्चा केली मात्र जाधव कुंटुंबियांना आपील करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या मात्र नंदा जाधव यांनी आम्ही कोणतीही चुक केली नाही.प्रशासनाच्या चुकीसाठी अपील करणार नसल्याचे सांगत उपोषण सुरूच ठेवले आहे.
बागेवाडीचे तलाठी,जत मंडल अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नंदा जाधव कुंटुंबिय उपोषणास बसले आहेत.