माधवनगर : आत्मविश्वासानं उभी राहणारी पिढी घडवण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. शिक्षण नेमकं कशासाठी घ्यायचं ते त्यांनी सांगितलं. त्यांचा विचार जागता ठेवायचा असेल तर आता बहूजन समाजातील जिद्दी, हूशार मुलांचे अधिकारी व्हायचे स्वप्न अर्ध्यावर थांबता कामा नये. ही मुलं अधिकारी बनण्यासाठी प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील सोशल फोरम विविध मार्गांनी कार्यरत असेल, अशी ग्वाही फोरमचे अध्यक्ष डॉ. जयसिंगराव पवार यांनी दिली.
फोरमच्या कार्यकारिणीची व्यापक बैठक आज शांतिनिकेतन लोकविद्यापीठ येथे पार पडली. या बैठकीत डॉ. पवार बोलत होते. बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. नवी पिढी स्वावलंबी आणि स्वाभिमानी घडवण्यासाठी थेट कृती कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. पवार यांनी यावेळी दिली.स्वागत नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील यांनी केले. फोरमच्यावतीने महापुरग्रस्त आणि कोरोनाग्रस्तांना आर्थिक आणि सामाजिक मदत करण्यात आली असून यापुढेही विविध मार्गांनी फोरम सामाजिक कार्यात सक्रीय असेल, असे त्यांनी सांगितले.
फोरमचे सचिव बी.आर. थोरात यांनी फोरमच्या कार्याचा आढावा घेतला. एम.के.आंबोळे यांनी कार्यकारिणीबाबत माहिती दिली. अॅड. बी.एस.पाटील, सनतकुमार आरवाडे, शामरावअण्णा पाटील, वैभव नायकवडी यांच्यासह अॅड. अजित सुर्यवंशी, दिनकर साळूंखे, मंजुश्री पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.
डी.एस.माने यांनी सुत्रसंचालन केले तर पी.टी.जामदाडे यांनी आभार मानले. बैठकीस डॉ. अविनाश पाटील, डॉ. मोहन पाटील, हणमंतराव शिंदे, कुशाजीराव थोरात, मिलिंद खिलारे, दादासाहेब ढेरे, एकनाथ जाधव, नंदकुमार साखरे, शौकत मुलाणी, टी.डी.पाटील, बापुसाहेब पाटील, डॉ. विश्वनाथ पाटील, शिवाजी पाटील, प्रा. प्रभा पाटील, जयश्री पैलवान, समिता पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यशदा संस्थेच्या विविध कोर्सेस आणि उपक्रमांचा फायदा इथल्या युवकांना व्हावा यासाठी यशदाचे एक केंद्र शांतिनिकेतन लोकविद्यापीठामध्ये व्हावे यासाठी संस्था प्रयत्नशिल आहे. तसे झाले तर पश्चिम महाराष्ट्र-कोकणातील युवकांना खुप मोठी सुविधा तयार होईल. शांतिनिकेतन ग्रंथालयाच्यावतीनेही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात येणार आहे.– गौतम पाटील, संचालक नवभारत शिक्षण मंडळ.
सोशल फोरमच्या बैठकीत प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना डॉ. जयसिंगराव पवार, अॅड. बी.एस.पाटील, शामराव पाटील, सनतकुमार आरवाडे.