जत,संकेत टाइम्स : जत नगरिला ऐतिहासिक व पौराणीक इतिहास आहे. जत नगरिचे प्राचिन नाव हे जयंतीनगरी असे होते. या नगराच्या मध्यवर्ती भागातून गंधर्व नदी दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते,प्राचिन काळी या नदिचे पात्र हे विशाल होते परंतु या नदीत स्वर्गातील गंधर्व स्नान करताना त्यांच्याकडून माता पार्वतीचा अपमान झाल्याने पार्वती मातेने नदीला शाप दिल्याने ती अदृष्य होऊन वाहत आहे,अशी अख्यायिका आहे.याच गंधर्व ओढापात्राचे पश्चिम बाजूस महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे व नवसाला पावणारी देवीदेवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री. यल्लमादेवीचे मंदिर आहे.
या मंदिराबाबतही अख्यायिका ऐकावयास मिळते ती अशी, जत हे डफळे संस्थानचे अधिपत्याखाली होते. संस्थानचे अधिपती हे कर्नाटक राज्यातील सौंदत्ती येथिल श्री. यल्लमादेवीचे नि:सिम भक्त होते.सौंदत्ती येथिल श्री.यल्लमादेवी च्या दर्शनासाठी श्रीमंत डफळे हे प्रत्येक पोर्णिमेला जाऊन देविचे दर्शन घेत असत. श्रीमंत डफळे यांनी प्रत्येक पोर्णिमेला आपल्या निवडक सरदारासोबत जाऊन देविचे दर्शन घेण्याचा जणू नियमच केला होता. श्रीमंत हे कितीही अडचणी असल्यातरी देविचे पोर्णिमेदिवशी दर्शनासाठी न चुकता जात होते. देविचे कृपेने संस्थानात सर्व काही चांगले चालले होते. राजा व प्रजा दोघेही सुखी व आनंदी होते.
कालांतराने श्रीमंताचे वय झाल्याने त्यांना एवढा लांबचा घोड्यावरचा प्रवास झेपेना झाला व देविच्या दर्शनाची आसही कमी होईना.त्यामुळे राजा चिंताग्रस्त दिसायला लागला.पोर्णिमेच्या आगोदरच एकेदिवशी राजाला एक स्वप्न पडले व स्वप्नात प्रत्यक्ष येऊन देवीने दर्शन दिले व सांगितले की, राजा मला तुझी चिंता समजली आहे. परंतु तु काही काळजी करू नकोस.आता येणारे पोर्णिमेला तु नेहमीप्रमाणे माझे दर्शनासाठी ये पण येताना पालखी व शाही लवाजामा व वाजंत्री यांना सोबत घेऊन ये सौंदत्ती येथे तू आल्यानंतर माझी आरती कर व माझी मूर्ती पालखीत ठेवून तू मला तुझ्याबरोबर तुझ्या नगरित येण्याविषयी प्रार्थना कर त्यानंतर मी पालखीत बसून तुझ्याबरोबर तुझ्या नगरीत येईन परंतु हे सर्व करित असताना व पालखी येथून निघालेनंतर तू मात्र कोणत्याही परिस्थितीत पाठीमागे वळून पहायचे नाहीस असे वचन मला दे तर मी तुझ्याबरोबर तुझ्या नगरीत शाही लवाजाम्याबरोबर पालखीत बसून येईन असा दृष्टांत दिला.
देविने स्वप्नात येऊन दृष्टांत दिल्याप्रमाणे डफळे राजाने देविला आणण्यासाठी चांगल्या प्रकारे पालखी तयार केली, वाजंत्री व शाहीलवाजामा बरोबर घेऊन सौंदत्ती येथून श्री. यल्लमादेवी ला आणण्यासाठी रवाना झाले. सौंदत्ती येथे गेल्यानंतर देविची आरती व पूजा करून देविला जत नगरित येण्यासाठी प्रार्थना केली व देवीची मूर्ती पालखीत ठेवून देविची पालखी शाही लवाजाम्याबरोबर जतकडे येऊ लागली. देविच्या पालखीबरोबर राजा चालत होता त्यावेळी राजाला देविच्या पायातील घुंगराचा आवाज ऐकावयास येत होता. राजा उत्साहात देविला पालखीत बसवुन कोकटनूर मार्गे जतनगराकडे येऊ लागला असताना कोकटनूर जवळ अचानक एक घटना घडली. राजाला सौंदत्ती येथून पालखी घेऊन निघताना जो घुंगराचा आवाज कानावर पडत होता तो आवाज अचानकपणे बंद झाला त्यामुळे घुंगराचा आवाज का बंद झाला म्हणून राजाने पाठीमागे वळून पाहीले असता अचानक आकाशात मोठा गडगडाट होऊन जोरात विज चमकली.
कोकटनूर येथून पुढे जत नगरीकडे पालखी जात असताना राजाला देविच्या पायातील घुंगराचा आवाज ऐकावयास न मिळाल्याने राजा नाराज झाला व तशीच देविची पालखी घेऊन जत नगरित आला.त्याच रात्री देविने परत एकदा राजाला स्वप्नांत येऊन दृष्टांत दिला की,राजा तू घाबरू नकोस व कोणतीही चिंता करू नकोस मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. व मी अदृष्यपणे पालखीबरोबर तुझ्यानगरीत आले आहे.
तू आता असे कर तुझ्या नगरिच्या मधुन जी नदी वाहते आहे. त्या नदीच्या काठावर माझे चांगले मंदिर बांध व त्या मंदिरात माझ्या मूर्तीची स्थापना कर,माझा आशिर्वाद तुझ्याबरोबर आहे तुझे कल्याण होवो असे म्हणून देवी अदृष्य झाली.
देविने स्वप्नात येऊन दृष्टांत दिल्याप्रमाणे डफळे राजाने गंधर्व नदीचे काठावर देविचे सुंदर असे मंदिर बांधले व मंदिरात देविची स्थापना केली. तेच हे महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे व नवसाला पावणारी श्री.रेणुका देवी(यल्लमा) चे सुंदर असे मंदिर पहावयास मिळत आहे.दरवर्षी मार्गशिर्ष महिन्यात अमावस्येपूवी श्री. यल्लमादेवी ची मोठी यात्रा भरविण्यात येते. ही यात्रा जवळपास नऊ दिवस असते. यात्रेत प्रमुख तीनच दिवस असतात पहिल्या दिवशी गंधोटगी, दुसरे दिवशी देविला नैवेद्य अर्पण करण्याचा दिवस तर तिसरे दिवसे पालखी नगरप्रदक्षिणा व किचाचा कार्यक्रम असे कार्यक्रम असतात.नवरात्रीला तर अगदी पहाटे पहाटे देविची आरती होते व देविचे भक्त देविची गाणी म्हणून देविचा जागर घालतात.
असा हा जतनगरीच्या श्री.यल्लमादेवी चा महिमा आहे.