उमदी : ऊस तोडणीचा हंगाम सुरू होताच जत तालुक्यातील तब्बल 10 हजार मजूर पश्चिम महाराष्ट्रासह परराज्यात स्थलांतरित झाले आहे. कारखान्यांच्या टँक्टर व ट्रकमधून शेकडो मजूर गावागावातून जात असल्याने गाव, तांडे, वाड्या, वस्त्या ओस पडल्या आहे. तर अनेकांनी आपल्या मुलाबाळांना सोबत नेल्याचे शाळांची पटसंख्याही घसरली आहे.
जत तालुक्यातील पुर्व भागात मजुरांची संख्या मोठय़ा प्रमाणात ऊस तोडणीचा हंगाम आला की, हजारो मजूर कारखान्याकडे धाव घेतात. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र,कर्नाटक आदी भागात ऊस तोडणीसाठी जातात.जर वर्षी मोठय़ा प्रमाणात मजुरांची स्थलांतरण होत असताना प्रशासनाकडे मात्र कोणतीही नोंद दिसत नाही.
गावखेड्यातील अनेक घरांना चक्क कुलूप लागले असून काही गावात तर केवळ वृद्ध मंडळीच दिसून येतात. परिणामी शाळांमधील पटसंख्याही रोडावली आहे. ऊस तोड मजुरांच्या पाल्यांसाठी वसतिगृहाची योजना तीन वर्षापूर्वी अमलात आणली होती. परंतु ही योजना भ्रष्टाचाराचे कुरण झाल्याने बंद पडली. गावात मुलगा दुसर्याच्या भरोश्यावर ठेवण्यापेक्षा मजुरांनी आपल्या शाळकरी मुलांनाही सोबत नेले आहे. तसेच लहान मुलांना सांभाळण्यासाठी मोठी मुले कामी येत असल्याने त्यांनाही पालक आपल्यासोबत घेऊन गेले आहे. परिणामी ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे.